अदानींवरून लक्ष विचलित करण्याची खेळी, पण आम्ही शेवटपर्यंत सोडणार नाही; राहुल गांधींचा मोदी सरकारला इशारा

अदानी लाचखोरी प्रकरणावरून विरोधी पक्षांनी संसदेत मोदी सरकारला घेरले आहे. सततच्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प होत आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी संसद परिसरात माध्यमांशी संवाद साधला.

माझी लोकसभा अध्यक्षांसोबत बैठक झाली. सभागृहात माझ्याबद्दल जी काही अपमानास्पद वक्तव्य केली गेली ती कामकाजातून वगळावी, अशी आमच्या पक्षाची मागणी आहे. अशी वक्तव्य तपासू असे लोकसभा अध्यक्षांनी म्हटले आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. माझ्यावर उलटसुलट आरोप होतच असतात. आम्हाला कितीही उकसवण्याचा प्रयत्न झाला तरी सभागृहाचं कामकाज मात्र सुरू ठेवणार, असं आम्ही ठरवलं आहे. काहीही करून सभागृह चालावं, असाच आमचा प्रयत्न असेल. सभागृहात चर्चा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. 13 तारखेला संविधानावर चर्चा आहे आणि ही चर्चा व्हायला हवी. त्यामुळे सभागृहाचं कामकाज आम्ही सुरूच ठेवू, असे राहुल गांधी म्हणाले. माझ्याबद्दल विरोधकांना काहीही बोलू दे, ते बोल शकतात. 13 तारखेला चर्चा व्हायला हवी, असे ते पुढे म्हणाले.

अदानींवर सरकारला चर्चा करायची नाही. अदानींपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सरकार करत आहेत. त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. मात्र, अखेरपर्यंत आम्ही सोडणार नाही, असा इशारा राहुल गांधी यांनी सरकारला दिला आहे. ते माझ्यावर आरोप करतच राहतील. सभागृह चाललं पाहिजे, असं आम्ही सांगितलं. कितीही आरोप करू देत, काही फरक पडणार नाही. आम्ही सभागृहाचं कामकाज सुरू ठेवू. 13 तारखेला चर्चा व्हायला पाहिजे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न आहे. पण सभागृह चालवण्याची जबाबदारी आमची नाही. मात्र, सभागृह शंभर टक्के चालेल, असा आमचा प्रयत्न असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.