राहुल गांधी आज मणिपूरमध्ये, मोदी निघाले रशियाला

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधी उद्या, सोमवारी प्रथमच मणिपूरच्या दौऱयावर येत आहेत. मणिपूरच्या वांशिक यादवीत होरपळलेल्या नागरिकांची ते विचारपूस करणार असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र सोमवारी रशियाच्या दौऱयासाठी भुरर्र होणार आहेत.

 मे, 2023 पासून राहुल गांधी यांची हिंसाचारग्रस्त मणिपूरला ही तिसरी भेट असून, मणिपूरकडे आतापर्यंत न फिरकलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, विदेश दौऱयांपेक्षा मणिपूरकडे बघावे असा संदेश देण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न आहे.

मणिपूरच्या दिवसभराच्या दौऱयात गांधी, जिरीबाम, चुराचंदपूर (जिल्हे) आणि मोइरांग (बिष्णुपूर जिल्हा) या तीन ठिकाणी मदत छावण्यांमधील हिंसाचारग्रस्त लोकांना भेटतील. ते राज्यपाल अनुसुया उईके यांचीही भेट घेणार आहेत.

z मणिपूर भेटीसाठी अद्याप वेळ न मिळालेले पंतप्रधान मोदी 8-9 जुलै रोजी रशियाला जाणार आहेत. त्यानंतर 9-10 जुलै रोजी ऑस्ट्रियाला जाणार आहेत.

हाथरस चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबांना वाढीव भरपाई द्यावी

हाथरस येथील भोलेबाबा सत्संगातील चेंगराचेंगरीत दगावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना आणि जखमींना वाढीव भरपाई देण्याचे आवाहन लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केले आहे. या घटनेला जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी योगी यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे.