माझे वडील वारले त्यावेळी जसे दु:ख झालेले आज तसंच वाटतंय, राहुल गांधी झाले भावूक

काँग्रेस खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी गुरुवारी वायनाड दुर्घटनेतील जखमींची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी भावूक झालेले दिसून आले.

”माझे वडील वारले तेव्हा ज्या मनस्थितीत होतो तसंच आज वाटतंय. इथे लोकांनी फक्त वडील गमावले नाहीत. काहींनी संपूर्ण कुटुंब गमावलं आहे. आई वडील भाऊ बहिण गमावले आहेत. मला आता काय वाटतंय त्यापेक्षाही हे खूप जास्त गंभीर आहे. हे खूप वाईट आहे. हजारो लोकं हे अनुभवत आहेत”, असं राहुल गांधी म्हणाले.

या वाईट परिस्थितीत या लोकांसोबत उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. मला अभिमान वाटतोय की संपूर्ण देशाचं वायनाडकडे लक्ष आहे आणि सर्वच वायनाडच्या लोकांना मदत करतील याची मला खात्री आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.