मोदी, BJP आणि RSS म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही; राहुल गांधी यांची लोकसभेत तुफान फटकेबाजी, सत्ताधाऱ्यांचा गदारोळ

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणवरील चर्चेत विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तर थेट देवाशी कनेक्शन आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी सणसणीत टोला लगावला. तसेच हिंसा आणि द्वेष पसरवणारे हिंदू नाहीत, असे म्हणत पंतप्रधान मोदी, भाजप आणि आरएसएसचा समाचार घेतला. राहुल गांधी यांची ही टीका पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एवढी जिव्हारी लागली की त्यांना दोन वेळा उठून बोलवाले लागले.

पंतप्रधान म्हणतात (महात्मा) गांधींचा मृत्यू झाला आणि एका चित्रपटाद्वारे गांधींना पुनर्जीवित करण्यात आले. ही तुमची अज्ञानता आहे का? आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे केवळ एकच धर्म धैर्याबद्दल बोलत नाही, सर्व धर्म धैर्याबद्दल बोलतात. मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध या सर्व धर्मांत धैर्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच भिऊ नका आणि घाबरवू नका, असा संदेश सर्व धर्मातून देण्यात आल्याचे राहुल गांधी म्हणाले.

लोकसभा निवडणुकीचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. मला देवाने पाठवले आहे (देवदूत), या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा राहुल गांधी खरपूस समाचार घेतला. भारताची विचारधारा, संविधान आणि संविधानावर हल्ला करणाऱ्यांना विरोध करणाऱ्यांवर एक योजनाबद्द आणि व्यापक हल्ला केला गेला. आपल्यापैकी अनेकांनावर वैयक्तिक स्वरूपात हल्ले झाले. काही नेता अजूनही तुरुंगात आहेत. ज्यांनी ज्यांनी सत्ता, धनाढ्यशाहीला आणि दलीत तसेच अल्पसंख्यकांवरील अत्याचारांना विरोध केला, त्यांना दडपण्यात आले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार, हिंदुस्थानच्या पंतप्रधानांच्या आदेशानुसार माझ्यावर हल्ला करण्यात आला. त्यातील सर्वात आनंददायी भाग म्हणजे ईडीने केलेली 55 तासांची चौकशी. आपल्या सर्व महापुरुषांनी अहिंसा आणि भीती दूर करण्याचा संदेश दिला आहे. पण जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते फक्त हिंसा, द्वेष, असत्य यावर बोलतात. त्यामुळे तुम्ही हिंदू नाही, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.

हिंदुस्थानने कधी कुणावर हल्ला केला नाही. याचे कारण म्हणजे हिंदुस्थान अहिंसा मानणारा देश आहे. आपल्या महापुरुषांनीही घाबरू नका आणि घाबरवू नका, असा संदेश दिला आहे. शिवजीही तेच म्हणतात घाबरू नका आणि घाबरवू नका आणि ते आपले त्रिशूळ जमिनीत रोवतात. दुसरीकडे जे आपल्याला हिंदू समजतात ते 24 तास हिंसा-हिंसा-हिंसा आणि द्वेष.. द्वेष.. द्वेष… पसरवतात. यामुळे तुम्ही हिंदू नाहीच. सत्याची कास धरा असे हिंदू धर्मात स्पष्ट लिहिले, असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधा मोदी आणि भाजपला सुनावले.

टीका पंतप्रधान मोदींच्या जिव्हारी

राहुल गांधी यांची टीका जिव्हारी लगाल्याने पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोध केला. यानंतर सत्ताधारी खासदारांनी लोकसभेत गदारोळ केला. पंतप्रधान मोदी उठले आणि ही गंभीर बाब असल्याचे म्हणाले. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं गंभीर आहे, असे मोदी म्हणाले. त्यावर राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले. नरेंद्र मोदी, भाजप  आणि आरएसएस म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही. भाजपने हिंदूंचा ठेका घेतलेला नाही, असा भीमटोला राहुल गांधी यांनी लगावला. यावरून लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांनी एकमेकांवर आरोप केल्याने गदारोळ झाला.

देशासाठी बलिदान देणाऱ्या अग्निवीरांना पंतप्रधान मोदी शहीद मानत नाहीत. मोदी सरकारसाठी अग्निवीर म्हणजे युज अँड थ्रो मजूर आहे. अग्निवीर ही लष्कराची योजना नाही तर PMO ची स्कीम आहे. आमचे सरकार आल्यावर अग्निवीर योजना बंद करू. कारण ही योजना लष्कर, जवान आणि देशभक्तांविरोधात आहे, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.