राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे जोरधार भाषण झाले. या भाषणात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपच्या नकली हिंदुत्वाची सालटी काढली. राहुल गांधी यांच्या भाषणावेळी मोठा गदारोळ झाला. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांनी भाजप म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नव्हे, असे म्हणत पंतप्रधान मोदी आणि आरएसएसवरही निशाणा साधला. आता राहुल गांधी यांच्या भाषणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राहुल गांधी यांनी सोमवारी केलेल्या भाषणाचा मोठा भाग सभागृहाच्या कामकाजातून हटवण्यात आला आहे. यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून आक्षेप नोंदवला आहे.
लोकसभेत राहुल गांधी यांनी दिलेल्या भाषणाचा एक मोठा भाग सभागृहाच्या कामकाजातून हटवण्यात आल्याने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून विरोध दर्शवला आहे. आपल्या भाषणाचा एक मोठा भाग संसदेच्या कामकाजातून हटवण्यात आल्याने मोठा धक्का बसला आहे, असे राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान माझ्या भाषणातून हटवण्यात आलेल्या टिप्पणी आणि अंशांसंदर्भात हे पत्र आहे. लोकसभा अध्यक्षांना सभागृहाच्या कामकाजातून काही टिप्पणी हटवण्याचे अधिकार आहेत. पण फक्त तेच शब्द हटवण्याची तरतूद आहे जे लोकसभेची प्रक्रिया आणि संचालन नियमांनुसार नियम 380 मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. पण माझ्या भाषणाचा एक मोठा भाग कामकाजातून हटवण्यात आला हे धक्कादायक आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी पत्रातून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.