झारखंडमध्ये राहुल गांधी यांचं हेलिकॉप्टर रोखल्याचा आरोप, पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम कारणीभूत?

लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर रोखल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. दोन तासाहून अधिक वेळ उलटूनही राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी दिली गेली नव्हती. झारखंडमध्ये हा प्रकार घडला आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर एअर क्लिअरन्स न मिळाल्याने रोखण्यात आले होते.

महाराष्ट्रासह झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे प्रचार सभा घेत आहेत. राहुल गांधी यांची आज झारखंडमध्ये प्रचार सभा झाली. ही सभा झाल्यानंतर राहुल गांधी हेलिकॉप्टरने बेरमो येथे सभेसाठी रवाना होणार होते. पण एअर क्लिअरन्स न मिळाल्याने राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर महगामामध्येच रोखण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झारखंडच्या जमुईमध्ये कार्यक्रम होता. त्यानंतर ते देवघर येथे जाऊन मग दिल्लीला परणार आहेत. यामुळेच राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरला एअर क्लिअरन्स दिला गेला नाही. त्यामुळे राहुल गांधी हे बराच वेळ हेलिकॉप्टरमध्येच बसून असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. राहुल गांधा यांचा हा व्हिडिओ समोर आला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही हेलिकॉप्टर काही दिवसांपूर्वी लातूरमध्ये रोखण्यात आले होते. औसा मतदारसंघातील सभा झाल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या सभेचं कारण देत उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण काही काळासाठी रोखण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरला औसा येथील हेलिपॅडवरून उड्डाण करण्यास परवानगी नाकारण्यात आली होती.