राहुल का डर…भाषणातील काही मुद्दे कामकाजातून वगळले

मोदींच्या विश्वात सत्य वगळले जाऊ शकते, परंतु वस्तुस्थिती वगळता येणार नाही. माझ्या भाषणातील हवे तेवढे मुद्दे हटवा, परंतु मला जे सांगायचे होते ते मी सांगितले आहे.

लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी बसल्यानंतर राहुल गांधी यांनी पहिलेच भाषण तडाखेबंद केले. 90 मिनिटांच्या भाषणात त्यांनी अग्निवीर योजना, नोटाबंदीसह हिंदुत्व अशा अनेक मुद्दय़ांवरून एनडीए सरकारची अक्षरशः सालटी काढली. नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतून निवडणूक लढवली असती तर त्यांना पराभव पत्करावा लागला असता. वाराणसीतून लढले म्हणून थोडक्यात सुटले, असा खोचक टोलाही त्यांनी मोदींना लगावला. त्यानंतर हडबडलेल्या एनडीए सरकारने राहुल गांधी यांच्या भाषणातील हिंदू धर्म आणि राज्यघटनेशी संबंधित मुद्दे संसदेच्या कामकाजातून वगळल्याचे समोर आले.

या मुद्दय़ांचा एनडीएला धसका

अग्निवीर ही योजना लष्कराची नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ब्रेन चाइल्ड योजना आहे. ही योजना सैनिकांच्या विरोधात आहे, सैन्याच्या विरोधात आहे. याबाबतचे सत्य काय आहे हे अग्निवीरांनाही माहीत आहे.

कोटातील संपूर्ण परीक्षा ही केंद्रीकृत आणि अदानी, अंबांनींसारख्या उद्योगपतींना फायदा पोहोचविण्यासाठी आहे.

जे लोक स्वतःला हिंदू म्हणवून घेतात तेच लोक दिवसरात्र हिंसा-हिंसा, नफरत-नफरत, असत्य-असत्य बोलतात.

भाजप अल्पसंख्याक समाजासोबत अनुचित व्यवहार करत आहे.

आरएसएस हा संपूर्ण हिंदू समाज नाही. हिंदुत्व हा काही भाजपचा ठेका नाही.

 ‘नीट’बद्दल सभागृहात चर्चा व्हावी

‘नीट’सारख्या तब्बल 24 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित विषयावर संसदेच्या दोन्ही सभागृहांत चर्चा व्हावी, अशी विनंती राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्राद्वारे केली. गेल्या सात वर्षांत तब्बल 70 पेपर लीक झाले. लोकसभा अध्यक्षांनी या मुद्दय़ावर दोन्ही सभागृहांत चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते, याकडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधले. याप्रकरणी ठोस तोडगा काढायला हवा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

राहुल गांधी यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

भाषणातील मुद्दे संसदीय कामकाजातून वगळल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून याप्रकरणी आक्षेप नोंदवला. सभागृहात व्यक्त केलेले माझे मत सभागृहाच्या कामकाजातून हटवणे हे संसदीय लोकशाहीविरुद्ध आहे. त्यामुळे हटवण्यात आलेल्या मुद्दय़ांचा भाषणात पुन्हा समावेश केला जावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या भाषणातही आरोपांचा भडिमार होता, परंतु त्यांच्या भाषणातून केवळ एकच शब्द वगळण्यात आला. हा भेदभाव अनाकलनीय आहे. मी सभागृहात सत्य मांडले. संसदेत जनतेशी संबंधित मुद्दे मांडण्याचा अधिकार प्रत्येक खासदाराला आहे. हेच लक्षात घेऊन मी भाषण केले, असे राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.