![narendra modi rahul gandhi](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/05/narendra-modi-rahul-gandhi-696x447.jpg)
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या नियुक्तीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी असहमती व्यक्त केली आहे. बैठकीनंतर राहुल गांधी यानी एक असमहती दर्शवणारे पत्र जारी केले. त्यात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी नवीन मुख्य निवडणूक आयुक्त ( CEC ) नियुक्त करण्याचा घाईघाईने घेतलेला हा निर्णय हा ‘अनादर’ करणारा होता. पुढील निवडणूक आयोगाच्या आयुक्ताची निवड करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीचा भाग असलेले गांधी यांनी ‘X’ वरून आपली असहमती दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून देशाच्या सरन्यायाधीशांना समितीतून काढून टाकल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका केली.
काँग्रेस खासदारानं आपल्या पत्रामध्ये म्हटलं आहे की, घाईघाईनं घेतलेल्या या निर्णयामुळे लाखो मतदारांच्या ‘आपल्या निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेबद्दलच्या चिंता वाढल्या आहेत’.
‘समिति आणि प्रक्रियेच्या रचनेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जात असताना आणि अठ्ठेचाळीस तासांपेक्षा कमी वेळात त्यावर सुनावणी होणार असताना पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी मध्यरात्री नवीन मुख्य निवडणूक आयुक्तपदाची निवड करण्याचा निर्णय घेणे अनादर करण्यासारखं आहे’, असं राहुल गांधी म्हणाले.
सोमवारी रात्री राष्ट्रपतींनी माजी आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी आणि हरियाणाचे मुख्य सचिव डॉ. विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली.
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीच्या बैठकीनंतर काही तासांतच ही घटना घडली. राहुल गांधी यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात निवड प्रक्रियेवरील याचिकेवर सुनावणी होणार असल्याने या नियुक्तीवर आक्षेप घेतला.