मेक इन इंडिया कल्पना चांगली, मोदींनी प्रयत्नही केले, पण अपयशी राहुल गांधी यांचा हल्ला

मेक इन इंडिया ही खरे तर चांगली योजना होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी चांगले प्रयत्नही केले. मात्र या योजनेत पूर्णपणे अपयश आले, असा जोरदार हल्ला लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांनी आज केला. मेक इन इंडियाच्या अपयशामुळेच चीन भारतात ठाण मांडून बसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावर बोलताना त्यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकालातील मतदानाच्या संशयास्पद आकडेवारीवर अनेक प्रश्न उपस्थित केले. या निवडणुकीत भाजपप्रणित महायुती 288 पैकी 235 जागांवर विजय मिळवून सरकार स्थापन करण्यात यशस्वी ठरली.

 

गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात जितके मतदार वाढले नाहीत तितके अवघ्या पाच महिन्यांत वाढले आहेत. लोकसभेनंतर शिर्डीतील एका इमारतीत तब्बल सात हजार मतांची भर पडल्याचे उदाहरण आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची मतदार यादी, मतदारांचे पत्ते निवडणुकीचा डेटा काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार) उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून नेमके कुठल्या भागात मतदार वाढले किंवा वगळले गेले ही माहिती पडताळून घेता येईल. कारण, ज्या ठिकाणी भाजपप्रणित महायुतीचा विजय झाला आहे, त्या ठिकाणचेच मतदार वाढले आहेत, असे निरीक्षण गांधी यांनी नोंदवले. परंतु, आयोगाचा गेल्या काही वर्षांतील कारभार पाहता मला खात्री आहे की, विरोधकांची ही मागणी निवडणूक आयोग धुडकावून लावेल, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

माझा फक्त रबर स्टॅम्प

निवडणूक आयुक्तांची निवड यापूर्वी पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांचा समावेश असलेल्या समितीमार्फत होत होती, परंतु आता केंद्र सरकारने या समितीतून सरन्यायाधीशांना वगळून त्याऐवजी केंद्रीय गृहमंत्र्यांचा समावेश केला आहे. भविष्यात जेव्हा या समितीवर विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची वेळ येईल तेव्हा माझी भूमिका रबर स्टॅम्पसारखी राहणार आहे. असा समितीच्या कामात सहभागी होऊन तरी काय उपयोग, असा सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयुक्त बदलण्यात आले, तर दोन नव्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्यात आली, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

काँग्रेस अधिक दूरदर्शी

परराष्ट्र धोरणाबाबत काँग्रेस अधिक दूरदर्शी होती. आम्ही आमच्या पंतप्रधानांना अमेरिकेकडून बोलावणे यावे याकरिता परराष्ट्र मंत्र्यांना तिथल्या राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला पाठवत नव्हतो, असा टोला राहुल गांधी यांनी हाणला. यावर संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी नाराजी व्यक्त करत आक्षेप घेतला.

पाच महिन्यांत तब्बल  70 लाख मतदार कसे वाढले?

महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या अवघ्या पाच महिन्यांत हिमाचल प्रदेश या राज्याच्या लोकसंख्येइतके म्हणजे तब्बल 70 लाख मतदार नव्याने कसे तयार झाले, असा सवाल राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत केला. हा प्रकार संशयास्पद असून निवडणूक आयोगाने इलेक्टोरल रोलवरील डेटा विश्लेषणासाठी विरोधकांच्या महाविकास आघाडीला द्यावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. लोकसभेनंतर शिर्डीतील एका इमारतीत तब्बल सात हजार मतांची भर पडल्याचे उदाहरण त्यांनी दिले.