मध्यरात्री मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती हा सुप्रीम कोर्टाचा अनादर, राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा

rahul-gandhi

निवड प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडून मध्यरात्री मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करण्यात आली. हा तर न्यायालयाचा अनादर आहे, अशा शब्दांत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीवर टीका केली आहे. राहुल यांनी  असहमती पत्र पोस्ट केले असून त्यात भूमिका मांडली आहे.

मोदी सरकारने घाईघाईने घेतलेल्या या निर्णयामुळे लाखो मतदारांच्या आपल्या निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेबद्दलच्या चिंता आणखी वाढवल्या आहेत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. निवड समिती आणि निवड प्रक्रियेच्या रचनेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले असताना आणि अठ्ठेचाळीस तासांहून कमी वेळेत याप्रकरणी सुनावणी होणार असताना पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी मध्यरात्री निवडणूक आयुक्तपदाची निवड करण्याचा निर्णय घेणे हा तर अनादर आणि असभ्य वर्तन आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड करण्यात आली. त्यानंतर निवड प्रक्रियेतून सरन्यायाधीशांना वगळण्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना निवडीबाबत बैठक घ्यायला नको होती, असे राहुल गांधी यांनी बैठकीनंतर म्हटले होते.

सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेप्रकरणी दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालय प्रथम प्राधान्य देऊन 19 फेब्रुवारीला सुनावणी घेणार आहे.

सरकारला जाब विचारणे हे माझे कर्तव्य

लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श समोर ठेवून सरकारला जाब विचारणे हे माझे कर्तव्य आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जून 1949 मध्ये स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना करण्याप्रकरणी झालेल्या चर्चेदरम्यान केलेल्या भाषणाचाही उल्लेख राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात केला आहे. देशाच्या लोकशाहीतील आणि निवडणूक आयोगाच्या कामातील हस्तक्षेपाबद्दल डॉ. आंबेडकर यांनी त्यावेळीच इशारा दिला होता, याची आठवणही राहुल गांधी यांनी करून दिली आहे.

ज्ञानेश कुमार हे अमित शहांचे राईटहॅण्ड!

अमित शहा आणि ज्ञानेश कुमार कनेक्शनवर काँग्रेसने बोट ठेवले आहे. नवनियुक्त मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राईट हॅण्ड असल्याचे काँग्रेसने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. 2024 मध्ये झालेल्या निवडणुकांवर नजर ठेवण्यासाठी ज्ञानेश कुमार यांना निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यामुळेच संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर भाजपाचे नियंत्रण राहिले, असा आरोपही काँग्रेसने केला आहे.

मतदारांचा विश्वास सातत्याने घसरतोय

2 मार्च 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची निवड पंतप्रधान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांच्या निवड समितीद्वारेच झाली पाहिजे असे स्पष्ट निर्देश दिले होते, परंतु  मोदी सरकारने  निवड समितीतून सरन्यायाधीशांना वगळले. हे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असून  निवडणूक प्रक्रियेवरील मतदारांमधील विश्वास सातत्याने घसरतोय, असे राहुल म्हणाले.