राहुल गांधी यांचा लोकसभेत गौप्यस्फोट, अरुणाचलची 4 हजार चौरस कि.मी. जमीन चीनने बळकावली

हिंदुस्थानची एक इंचही जमीन चीनच्या घशात जाऊ दिली नाही, असा दावा करणाऱ्या मोदी सरकारला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज आरसा दाखवला. चीनने हिंदुस्थानच्या तब्बल 4 हजार चौरस किलोमीटर जमिनीवर ताबा मिळवला आहे, असा खळबळजनक दावा करत त्यांनी ही जमीन चीनकडून कधी परत घेणार याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावे, अशी मगाणीही लोकसभेत लावून धरली.

लोकसभेतील कामकाजाच्या शून्य प्रहराप्रसंगी राहुल गांधी यांनी हिंदुस्थान आणि चीनमधील परराष्ट्र संबंधांना 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त करण्यात आलेल्या सेलिब्रेशनवरून सरकारला धारेवर धरले.

राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावरूनही जोरदार टीका केली. एकीकडे चीनला 4 हजार चौरस किलोमीटरची जमीन देण्यात आली, तर दुसरीकडे अमेरिकेने हिंदुस्थानवर 27 टक्के रेसिप्रोकल टेरीफ लादला. या जशास तसा कर धोरणामुळे हिंदुस्थानची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, असे राहुल गांधी म्हणाले. देशातील वाहन उद्योग, औषधे आणि कृषी क्षेत्राचे प्रचंड नुकसान होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच याबाबत सरकारचे परराष्ट्र धोरण काय असणार, याबाबत पंतप्रधानांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही केली.

भाजपा, आरएसएसची परकियांसमोर झुकण्याची नीती

कुणीतरी इंदिरा गांधी यांना विचारले होते, परराष्ट्र धोरणात जर तुम्हाला डावीकडे जाल की उजवीकडे असे विचारले तर तुमचे उत्तर काय असेल. यावर मी डावीकडे किंवा उजवीकडेही जाणार नाही, मी हिंदुस्थानी आहे, मी सरळ उभी राहीन, असे उत्तर दिले होते. परंतु भाजपा आणि आरएसएसचे तत्त्वज्ञान वेगळे आहे. त्यांना डावीकडे की उजवीकडे जाणार असे विचारले तर ते नाही नाही, आम्ही प्रत्येक परकीयासमोर आमचे डोके झुकवणार. हेच त्यांच्या संस्कृतीत, इतिहासात आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे, असा टोलाही राहुल गांधी या वेळी लगावला.

पंतप्रधान, राष्ट्रपती चिनी राजदूतांना पत्र लिहितात

मला असे कळले की पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांनी चीनला पत्र लिहिले आहे. चिनी राजदूतच हिंदुस्थानातील आम्हाला याबाबत सांगत आहेत, आमचे लोक आम्हाला काहीच सांगत नाहीत, असे स्पष्ट करत राहुल गांधी यांनी सत्ताधारी एनडीए सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात संवाद नाही. हे अत्यंत चिंताजनक आहे असे नमूद केले.

परराष्ट्र सचिव चीनच्या राजदूतांसोबत केक कापताहेत

चीनने आपल्या जमिनीवर कब्जा केला असताना काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानच्या परराष्ट्र सचिवांनी काही दिवसांपूर्वी चीनच्या राजदूतांसोबत केक कापला, हे पाहून मी हैराण झालो. हिंदुस्थान-चीनच्या जवानांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात हिंदुस्थानचे 20 जवान शहीद झाले. याचे ते सेलिब्रेशन होते का, असा सवाल राहुल गांधी यांनी या वेळी सरकारला केला.