उत्तर प्रदेशातील संभल हिंसाचार प्रकरण देशभरात गाजत आहे. याच हिंसाचारग्रस्त भागाला भेट देण्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांचे शिष्टमंडळ बुधवारी सकाळी संभल येथे निघाले होते. मात्र पोलिसांनी त्यांना गाझीपूर बॉर्डवर रोखले आहे. 10 डिसेंबर पर्यंत संभलमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला प्रवेश नसल्याचे कारण यावेळी देण्यात आले.
संभल हिंसाचारप्रकरणी विरोधकांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांत आवाज उठवला असून बुधवारी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशातील 5 काँग्रेस खासदारांचे शिष्टमंडळ संभल येथे निघाले होते. हे शिष्टमंडळ या वेळी पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार होते. परंतु राहुल गांधी यांना गाझीपूर बॉर्डरवरच रोखण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
#WATCH | Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi at the Ghazipur border where he along with other Congress leaders have been stopped by Police on their way to violence-hit Sambhal. pic.twitter.com/HFu9Z4q07z
— ANI (@ANI) December 4, 2024
संभल येथे कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कलम 163 अंतर्गत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बाहेरच्या कुणालाही संभलमध्ये येण्याची परवानगी नाही. जर कुणी येण्याचा प्रयत्न केलाच तर त्यांना नोटीस देण्यात येईल असे पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी संभलच्या दिशेने निघालेल्या राहुल गांधी, प्रियांका गांधी, केसी वेणुगोपाल, केएल शर्मा, उज्जन रमन सिंह, तनूज पूनिया आणि इमरान मसूद यांचा ताफा गाझीपूर बॉर्डरवर अडवण्यात आला.
राहुल गांधी यांच्यासोबत संभलकडे निघालेल्या इमरान मसूद यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, लवकरच बॉर्डर खुली करण्यात येईल. लोकांना यात्रा त्रास होत असून आम्हालाही रोखण्यात आले आहे. तर तनूज पूनिया यांनी आम्ही 10 तारखेनंतर जाऊ असे म्हटले.
दरम्यान, संभल हिंसाचाराचा तपास सध्या सुरू आहे. फॉरेन्सिक टीम पुरावे गोळा करत आहे. या तपासादरम्यान पाकिस्तानी बनावटीची सहा काडतुसे संभल येथून हस्तगत करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. याशिवाय अमेरिकन बनावटीचे एक निकामी झालेले काडतुसही मिळाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.