Parliament Winter Session 2024 – मोदी-अदानी भाई भाई…, संसद परिसरात इंडिया आघाडीचं काळे मास्क घालून आंदोलन

Rahul Gandhi hold a protest march against the government over Adani issue inside Parliament premises

अदानी लाचखोरी प्रकरणावरून इंडिया आघाडीने संसदेत सरकारला धारेवर धरले आहे. आज पुन्हा इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद परिसरात अदानी प्रकरणावरून मोदी सरकार विरोधात आंदोलन केले. आंदोलनात ‘इंडिया’ आघाडीतील विरोधी पक्षांच्या खासदारांनी घोषणा देत आंदोलन केले. मोदी-अदानी एक है, एक है तो सेफ है, मोदी-अदानी भाई भाई…, अशा घोषणा विरोधी पक्षांच्या खासदारांनी दिल्या. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांच्यासह ‘इंडिया’ आघाडी अनेक खासदार या आंदोलनात सहभागी झाले होते. तोंडावर काळा मास्क घालून आणि त्या मास्कवर मोदी-अदानी भाई भाई, असे लिहून विरोधी पक्षांनी मोदी सरकारचा निषेध केला.

पंडित जवाहरलाल नेहरू जे स्वातंत्र्य लढ्यात 13 वर्षे तुरुंगात होते, त्यांना देशद्रोही म्हणतात. पाकिस्तानचे दोन तुकडे त्या इंदिरा गांधींना देशद्रोही म्हणतात. राजीव गांधी देशासाठी शहीद झाले, त्यांनाही देशद्रोही म्हटले जाते. ते आता राहुल गांधींवर अशीच टीका करत असतील तर त्यात काही नवीन नाही. मला माझ्या भावावर (राहुल गांधी) खूप अभिमान आहे. माझ्या भावाला देशापेक्षा मोठं काहीच नाही. देशाच्या एकतेसाठी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत 8 हजार किलोमीटरची यात्रा त्यांनी केली आहे. त्यात ते चार हजार किलोमीटर पायी चाललेत. त्यामुळे विरोधकांनी काहीही टीका केली तरी त्याने फरक पडत नाही, असा टोला प्रियंका गांधी यांनी राहुल गांधींवर टीका करणाऱ्या सत्ताधारी भाजपला लगावला. राहुल गांधी यांच्यावर गद्दार अशी टीका करणाऱ्या भाजपचे निशिकांत दुबे आणि संबित पात्रा यांना प्रियंका गांधी यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिले.

अदानी प्रकरणावर चर्चा करण्याची यांची (मोदी सरकार) हिंमत नाही. करावी चर्चा त्यांनी, चर्चा करण्यात काय आक्षेप आहे? लोकशाहीत चर्चा महत्त्वाची आहे. चर्चा करण्यालाही घाबरत आहेत, असा टोला प्रियंका गांधी मोदी सरकारला लगावला.

सरकार संसदेत विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधी पक्षनेत्याविरोधात एका सदस्याने आपमानास्पद वक्तव्य केलं. आणखी एका सदस्याने संसदेबाहेर वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे काँग्रेसने दोघांविरोधात आम्ही हक्कभंग प्रस्ताव (Privilege Motion ) मांडला. नियमानुसार कामकाज सुरू होताच त्यावर चर्चा करणं अपेक्षित आहे. पण ज्या सदस्याविरोधात प्रस्ताव मांडला गेला त्याला पुन्हा बोलण्याची परवानगी दिली गेली. लोकसभा अध्यक्ष पूर्णपणे सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत. हे दुर्दैवी आहे, असे काँग्रेस नेते खासदार के. सी. वेणुगोपाल म्हणाले.

भाजपचे निशिकांत दुबे आणि संबित पात्रा यांच्या विरोधात आम्ही हक्कभंग प्रस्ताव मांडला. यावर लोकसभा अध्यक्षांकडून आम्हाला निर्णयाची आपेक्षा होती. पण प्रश्नोत्तराचा तास तहकूब करण्यात आला. त्यांनी आम्ही ज्या विषयावर हक्कभंग प्रस्ताव मांडला होता त्यावर चर्चेची आमची मागणी होती. पण ज्या विरोधात आम्ही हक्कभंग प्रस्ताव माडला होता त्याच सदस्याला पुन्हा बोलण्याची परवानगी देण्यात आली. हे काय चाललंय? हा कट आहे. सरकारला सभागृह चालवायचं नाही. अदानी प्रकरणावर हे सरकार घाबरलेले, पळ काढत आहेत. पण आम्ही यांना सोडणार नाही. अदानी प्रकरणावर जाब विचारणारच, असे काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले.