ही कसली लोकशाही, ही तर दडपशाही! मोदीजी, तुमचा अहंकार मोडेल!! राहुल गांधी, अंबादास दानवे बरसले

लडाख ते दिल्ली पदयात्रा करत आलेले प्रख्यात संशोधक आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्यासह 150 जणांना दिल्लीच्या सीमेजवळ अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री करण्यात आलेल्या या कारवाईमुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला झोडपून काढले आहे.

हे चक्रव्यूहही मोडेल आणि सोबत तुमचा अहंकारही मोडेल!

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. यात ते म्हणाले की, “पर्यावरण आणि संविधानाने दिलेल्या हक्कांसाठी शांततेने मोर्चा काढणाऱ्या सोनम वांगचुक आणि शेकडो लडाख्यांना ताब्यात घेणे अस्वीकार्य आहे. लडाखच्या भवितव्यासाठी उभ्या असलेल्या ज्येष्ठांना दिल्ली सीमेवर का अडवले जात आहे? मोदीजी, शेतकऱ्यांप्रमाणेच हे चक्रव्यूहही मोडेल आणि तुमचा अहंकारही मोडेल. लडाखचा आवाज ऐकावा लागेल.”

ही तर दडपशाही!

“शतप्रतिशत शांततेने निघालेल्या 150 पदयात्रींना दिल्लीत डिटेन करण्यासाठी हजारोच्या संख्येने पोलीस? ही कसली लोकशाही, ही तर दडपशाही! अशीच वागणूक सरकारने सगळ्या आंदोलनांमध्ये ठेवली आहे आणि त्यांची किंमत केंद्र सरकारने अगोदर पंजाबात मोजली आता हरयाणात मोजणार आहे! सोनम वांगचुक शिवसेना तुमच्यासोबत आहे, कायम”, असे ट्विट अंबादास दानवे यांनी केले आहे.

लडाख बंद!

दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या अटकेविरोधात कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स आणि अपेक्स बॉडी लेहने लडाख बंद पुकारला आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत असून लेह बाजारातील दुकानदारांनी आपली दुकानं बंद ठेऊन वांगचुक यांच्या अटकेचा निषेध केला.