
हिंदुस्थानात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मोठा गडबड घोटाळा झाला. निवडणूक आयोगानेच काही तडजोडी करून हे सर्व घडवून आणल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत बोलताना केला. राहुल गांधी यांनी बोस्टन येथील ब्राऊन विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हिंदुस्थानातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर बोट ठेवले.
या मुद्द्यांकडे वेधले लक्ष
- महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत स्पष्टच शब्दात सांगायचं तर, या निवडणुकीत तरुणांच्या संख्येपेक्षा अधिक मतदान झालं. हे एक वास्तव असल्याचे सांगत राहुल गांधी निवडणुकीतील गैरप्रकारकडे लक्ष वेधले.
- निवडणूक आयोगाने संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंतची मतदानाची जी आकडेवारी दिली त्यामध्ये आणि 5.30 ते 7.30 काळात तब्बल 65 लाख मतदारांनी मतदान केलं, मात्र असं घडणं अशक्य आहे.
- कारण एका मतदाराला मतदान करण्यासाठी किमान 3 मिनिटं लागतात. हे लक्षात घेता मतदार पहाटे 2 वाजेपर्यंत रांगेत उभे होते आणि रात्रभर मतदान सुरू होते. प्रत्यक्षात असं काही घडलं नाही.
- नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत अनियमितता करून मोठ्या प्रमाणात गडबड करण्यात आल्याचे सांगितले. मतदानाची वेळ संपण्याच्या काळात दिलेली मतदानाची आकडेवारी आणि त्यानंतरच्या दोन तासांतील मतदानाची आकडेवारी ही हेच दर्शविते की, निवडणूक आयोगानेच तडजोडी करून हे केले आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
….म्हणून निवडणूक कायद्यात बदल
आम्ही निवडणूक आयोगाला मतदान प्रक्रियेची चित्रिकरण केल आहे का? अशी विचारणा करून ते देण्याची मागणी मागणी केली होती. मात्र, त्यावर त्यांनी स्पष्ट नकार दिला. एवढंच नाही तर त्यांनी कायदाच बदलला. त्यामुळे आता चित्रिकरण मागता येणार नाही. याचा अर्थ सरळ आहे. निवडणूक आयोगाने तडजोड केली. निवडणूक प्रक्रियेत गंभीर घोळ आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.