लोकसभेच्या रणसंग्रामात इंडिया आघाडीने मोदी-शहांना जोरदार दणका दिला. त्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नव्याने मोहीम उघडत मोठा बॉम्ब टाकून खळबळ उडवून दिली आहे. खोटा एक्झिट पोल प्लांट करून मोदी आणि शहांनी स्टॉक मार्केटच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कॅम केला आहे. यामुळे निकालादिवशी शेअर बाजार आपटून 5 कोटी सामान्य गुंतवणूकदारांचे तब्बल 30 लाख कोटी बुडाले आहेत, असा गंभीर आरोप करतानाच या प्रकरणी संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर एक्झिट पोल समोर आले तेव्हा शेअर मार्पेट अचानक वाढले. मात्र निकालाच्या दिवशी शेअर मार्पेट कोसळलं. या सर्व घडामोडींआधी मोदी-शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी करण्यासाठी आकर्षित करणारी विधाने केली. लोकांना शेअर मार्पेटमध्ये गुंतवणूक करायला लावली. प्रत्यक्षात 4 जून रोजी काय होणार? निवडणुकीचे निकाल काय येणार? हे त्यांना माहिती होतं. तरीही लोकांना भरीस पाडण्यात आलं. हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
एक्झिट पोल करणाऱ्यांचीही चौकशी करा
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांच्याबरोबरच फेक एक्झिट पोल करणाऱ्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
त्या दिवशी शेअर बाजारात नेमके काय झाले?
– 3 जून: सेन्सेक्स 2507 अंकांनी वधारला. गुतवणूकदारांची 13.78 लाख कोटींची कमाई झाली.
– 4 जून: सेन्सेक्स तब्बल 4389 अंकांनी कोसळला. त्यामुळे गुंतवणूकदारांचे 30 लाख कोटींवर रुपये बुडाले.
शेअर बाजारात गुंतवणुकीचा सल्ला पंतप्रधान कसे देतात?
पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या पाच कोटी कुटुंबांना विशिष्ट काळात गुंतवणुकीचा सल्ला का दिला? लोकांना गुंतवणुकीचा सल्ला देणे हे पंतप्रधानांचे काम आहे का? स्टॉक मार्केटमध्ये फेरफार केल्याबद्दल सेबीच्या चौकशीला सामोरे जाणाऱ्या अदानी समूहाच्या मालकीच्या मीडिया हाऊसलाच यासंबंधी मोदी-शहांनी मुलाखती का दिल्या, त्या चॅनलची यातील भूमिका काय, अशा प्रश्नांची सरबत्ती राहुल यांनी केली. एक्झिट पोल समोर आले आणि परदेशी गुंतवणूक वाढली, त्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि एक्झिट पोल यांचा काय संबंध आहे, याची चौकशी व्हायला हवी, असे राहुल म्हणाले. मोदी-शहांनी खेळलेल्या या खेळात सामान्यांचे 30 लाख कोटी बुडाले तर त्याच वेळी मोजक्या विदेशी गुंतवणूकदारांचा हजारो कोटींचा फायदा झाला. चौकशी झाल्यास त्याचा पर्दाफाश होईल.
-भाजपला 220 जागा मिळतील, असे पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेत सांगितले होते, तर 200 ते 220 जागा मिळतील असा गुप्तचर विभागाचा अहवाल होता. ते पाहता 4 जूनला शेअर बाजार कोसळणार हे मोदींना माहिती होते. तरीही मोदी-शहांनी 4 जूनला शेअर बाजार विक्रमी उसळी घेईल, असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून सामान्य गुंतवणूकदार फसले. मोदी-शहांनी चुकीची माहिती का पसरवली आणि याचा लाभ कुणाला झाला हे समोर यायला हवे, असे राहुल म्हणाले.
मोदी-शहांच्या विधानांचा घटनाक्रम…
– 13 मे : 4 जूनच्या आधी शेअर्स खरेदी करा, असे आवाहन अमित शहा यांनी केले.
– 19 मे: 4 जून रोजी शेअर मार्पेट सर्व विक्रम मोडेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
– 1 जून: 1 जूनला आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमताचे दावे केले गेले.
– 3 जून: शेअर बाजाराची विक्रमी झेप.
– 4 जून: शेअर बाजार आपटला. त्यात 5 कोटी गुंतवणूकदारांचे 30 लाख बुडाले.