INDIA चं आव्हान उभं ठाकलं अन् मोदींना संविधानासमोर डोकं टेकवावं लागलं; राहुल गांधी यांचा हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील महू येथे जनतेला संबोधित केले. संविधान हे केवळ एक पुस्तक नाही, तर त्यात देशाचे हजारो वर्षे जुने विचार आहेत. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भगवान बुद्ध, महात्मा फुले अशा महापुरुषांचे विचार आणि आदर्श आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपवर हल्ला चढवला. त्यांना 400 जागा मिळाल्या तर ते संविधान बदलतील असे त्यांनी म्हटले होते. मात्र, त्यांच्यासमोर इंडिया आघाडीने आव्हान उभे केले. त्यामुळे नरेंद्र मोदींना लोकसभेत संविधानासमोर झुकावे लागले, असा हल्ला त्यांनी केला. राहुल गांधी यांनी सोमवारी मध्य प्रदेशातील महू येथे जय बापू, जय भीम, जय संविधान रॅलीला संबोधित केले.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपने संविधान संपवण्याची भाषा केली होती. त्यांनी म्हटले होते की जर त्यांना 400 जागा मिळाल्या तर ते संविधान बदलतील. मात्र, त्यांच्याविरोधात इंडिया आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते उभे राहिले. याचा परिणाम असा झाला की नरेंद्र मोदींना लोकसभेत संविधानासमोर झुकावे लागले. तसेच संविधान हे केवळ एक पुस्तक नाही, तर त्यात देशाचे हजारो वर्षे जुने विचार आहेत. त्यात डॉ. बाबासेहब आंबेडकर, महात्मा गांधी, भगवान बुद्ध, महात्मा फुले अशा महापुरुषांचे विचार आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वंयसेवक संघांचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते की, देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले नाही, ते खोटे स्वातंत्र्य होते. मोहन भागवत यांच्या विधानावरही त्यांनी पलटवार केला. ते म्हणाले की, त्यांचे असे वक्तव्य हा संविधानावर थेट हल्ला आहे. लक्षात ठेवा, ज्या दिवशी संविधान संपेल, त्या दिवशी देशातील गरिबांसाठी काहीही उरणार नाही, अशी भीतीही राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

भाजपने सर्व कंत्राटे दोन-तीन अब्जाधीशांना दिली आहेत. संविधानात असे लिहिले आहे की भारतातील सर्व नागरिक समान आहेत. संविधानात असे लिहिले आहे की प्रत्येक भारतीयाला स्वप्न पाहण्याचा आणि भविष्य घडवण्याचा अधिकार असावा. आज आपला देश 50 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारीचा सामना करत आहे. त्यांनी केलेली नोटाबंदी, त्यांनी लागू केलेला जीएसटी गरीबांना उद्ध्वस्त करण्याची त्यांची हत्यारे ठरली आहेत. पंतप्रधान मोदींनी अब्जाधीशांचे 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

पेट्रोलचे दर वाढतच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलच्या किमती कमी होत आहेत. मात्र, देशात पेट्रोलच्या किमती वाढतच आहेत. स्वातंत्र्यापूर्वी गरिबांना कोणतेही अधिकार नव्हते, ते फक्त राजाकडे होते. भाजप-आरएसएसला स्वातंत्र्यपूर्व काळातील देश हवा आहे. बेरोजगारीवर बोलताना राहुल गांधी म्हणाले, या देशात तरुणांना रोजगार मिळू शकत नाही, रोजगाराशिवाय प्रमाणपत्र निरुपयोगी आहे. या देशात आयआयएम आणि आयआयटी करणाऱ्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होत चाललंय हे आपल्याला दिसत आहे. ते तुम्हाला त्यांचा गुलाम बनवू इच्छितात, असा आरोपही त्यांनी केला.