केरळ, गुजरात, अंदमान बेटांवरील खाणकामामुळे मच्छीमार, जलचरांना धोका, निविदा रद्द करण्याची राहुल गांधी यांची मागणी

केरळ, गुजरात आणि अंदमान निकोबार बेटांवर समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर खाणकाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी निविदाही मागवण्यात आल्या आहेत. परंतु, या खाणकामामुळे मच्छिमारांच्या पोटावर पाय येऊ शकतो तसेच समुद्रातील जलचरांनाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

समुद्र किनायावरील परिसर खासगी कंपन्यांना उपलब्ध करून देणे अत्यंत चिंताजनक होईल. केंद्र सरकारने असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित लोकांशी चर्चा करणे गरजेचे होते असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. या परवानगीमुळे पर्यावरणाचेही मोठे नुकसान होणार आहे, ही गोष्टही सरकारने ध्यानात घ्यायला हवी होती याकडेही राहुल गाँधी यांनी पत्रातून लक्ष वेधले आहे.