अफगाणिस्तानचा विस्फोटक फलंदाज रहमानुल्लाहने झंझावती खेळ करत बांगलादेशी गोलंदाजांना फोडून काढले. त्याने केलेल्या वादळी खेळीमुळे अफगाणिस्तानने बांगलादेशचा तिसऱ्या वनडेमध्ये पाच विकेटने पराभव केला. त्याच बरोबर अफगाणिस्तानने पाच सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. रहमानुल्लाह गुरबाजने या सामन्यात ठोकलेले शतक सचिन, विराटसह बाबर आझमचा विक्रम मोडीत काढणार ठरले.
अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यामध्ये झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात 22 वर्षीय गुरबाज बांगलादेशी गोलंदाजांवर चांगलाच तुटून पडला होता. त्याने 120 चेंडूंचा सामना करत 5 चौकार आणि 7 खणखणीत षटकारांच्या मदतीने 101 धावा कुटून काढल्या. शारजहाच्या मैदानावर रंगलेल्या या सामन्यात गुरबाजने चौफेर फटकेबाजी करत चाहत्यांची मनं जिंकली. गुरबाजचे हे कारकिर्दीतले आठवे शतक ठरले. या शतकासह रहमानुल्लाह गुरबाज आशिया खंडातील कमी वयात सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज ठरला आहे. गुरबाजने हा विक्रम 22 वर्ष 349 दिवसांमध्ये पूर्ण केला आहे. त्याच बरोबर गुरबाज अफगाणिस्तानकडून सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज आहे.
रहमानुल्लाह गुरबाजने या बाबतीत दिग्गज खेळाडू सचिन तेंडूलकर यांच्यासह विराट कोहली आणि बाबर आझम यांना मागे टाकले आहे. सचिन तेंडूलकर यांनी 22 वर्ष 357 दिवसांचे असताना आपल्या कारकिर्दीतले आठवे वनडे शतक ठोकले होते. तसेच विराट कोहली याने 23 वर्ष 280 दिवस आणि बाबर आझमने 23 वर्ष 27 व्या दिवशी आठवे वनडे शतक ठोकलं होतं. याबाबतीत पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक पहिल्या क्रमांकावर असून त्याने 22 वर्ष 312 दिवसांचा असताना आठवे शतक ठोकले होते.