भरत बलवल्ली यांना ‘नादवेद परमहंस’ उपाधी, ‘रागोपनिषद’ संगीत ग्रंथाचे शानदार प्रकाशन

हिंदुस्थानी संगीतशास्त्राच्या उज्ज्वल परंपरेला पुढे नेणाऱ्या ‘रागोपनिषद’ या संगीतग्रंथाचे नुकतेच शानदार प्रकाशन झाले. या सोहळ्याच्या निमित्ताने स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांना हिंदुस्थानी संगीत आणि ज्ञान परंपरेच्या संवर्धन व प्रचारातील अतुलनीय योगदानासाठी ‘नादवेद परमहंस’ ही उपाधी प्रदान करण्यात आली.

‘रागोपनिषद’ या संगीत ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी देशभरातील कलाकार, संगीततज्ञ, संगीतप्रेमी, आचार्य भगवंत उपस्थित होते. ग्रंथाला डॉ. भरत बलवल्ली यांनी संगीतबद्ध केलंय. स्वर्गीय उस्ताद राशिद खान, पंडित उल्हास कशाळकर, सुरेश वाडकर, सोनू निगम, शंकर महादेवन, जसपिंदर नरूला, जावेद अली, कौशिकी चक्रवर्ती, डॉ. अश्विनी भिडे, पंडित वेंकटेश कुमार, पंडित शौनक अभिषेकी, पंडित रघुनंदन पणशीकर, पंडित राम देशपांडे, उस्मान मीर, राहुल देशपांडे, देवकी पंडित, पंडित जयतीर्थ मेवुंडी, आरती अंकलीकर, पंडित आनंद भाटे आणि पंडित संजीव अभ्यंकर आदी संगीत साधकांचा स्वर ‘रागोपनिषद’ला लाभलाय.

आचार्य भगवंत श्रमद् विजय तीर्थभद्र सुरिश्वरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रागोपनिषद’ ग्रंथाची संकल्पना साकारण्यात आली आहे. हा केवळ एक शास्त्रीय संगीताचे संकलन नसून, संगीत आणि आध्यात्मिक साधनेचा सेतू आहे. स्वर, शब्द, ध्यान आणि तपश्चर्येचा मिलाफ असलेल्या या ग्रंथाच्या माध्यमातून हिंदुस्थानी संगीताच्या गुढतेचा नवा प्रकाश पडतो.

दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील धुळीचा स्थानिक रहिवाशांना त्रास होत असतो. उन्हाळ्यात हा त्रास वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना शाखा क्रमांक 191 आणि मुंबई महापालिकेच्या वतीने आमदार विभागप्रमुख महेश सावंत यांच्या प्रयत्नांनी उपनेत्या विशाखा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी शाखाप्रमुख अजित कदम यांच्यासह शाखेतील पदाधिकारी, पालिका कर्मचारी आणि स्थानिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

n ताडदेव येथील जीवन ज्योत ड्रग्स बँकेतर्फे दुर्धर आजारावरील रुग्णांना सवलतीच्या दरात औषधे व वर्षभराचे धान्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला ताडदेवच्या राजाचे सहकार्य लाभले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. त्या वेळी संस्थेच्या ट्रस्टी मंजुबेन वोरा, सिद्धेश माणगावकर उपस्थित होते.