>> पंढरीनाथ तामोरे
केळवे-पालघर परिसरातील कवी, साहित्यिक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पालघर तालुका मराठी साहित्य मंडळाचे पूर्वाध्यक्ष, कोमसापचे मार्गदर्शक रघुनाथ माधव पाटील ऊर्फ कवी आरेम यांचे 28 जून 2024 रोजी केळवे येथे निधन झाले. श्री शीतलादेवीचा वरदहस्त लाभलेल्या सागरतिरी वसलेल्या निसर्गरमणीय अशा केळवे गावी 23 सप्टेंबर 1933 रोजी कवी आरेम यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण विरारच्या कै. हिरा विद्यालयामध्ये झाले. आगाशीला शिक्षण सुरू असताना त्यांच्या वडिलांची प्रकृती बिघडली व दहावीमध्ये शाळा सोडून ते केळव्याला आले. त्यानंतरचे शिक्षण त्यांनी केळवे माहीम येथील भुवनेश कीर्तने विद्यालयात पूर्ण केले. ते विरारला बहिणीकडे शिक्षण घेत असताना त्यांच्यावर चांगले संस्कार घडले. तिथे प्रतिष्ठत व्यक्तींची ऊठबस होती. त्यामुळे राष्ट्रप्रेमी मंडळी त्यांना जवळून पाहायला व अनुभवायला मिळाली. शिक्षणाबरोबर त्यांना चित्रकला, खेळ व नाटकाची खूप आवड होती. त्यांच्या घरात रामायण, महाभारत, पांडवप्रताप, शिवलीलामृत आदि ग्रंथांची पारायणे होत. बालपणी त्यांना कथा-कादंबऱया वाचनाचा छंद लागला. वि. स. खांडेकर, ना. सि. फडके, नाथमाधव, ह. ना. आपटे, महादेवशास्त्र्ााr जोशी, श्री. ना. पेंडसे, साने गुरुजींच्या विचाराने ते भारावून गेले. मंजुळा राऊत या आप्पांच्या अर्धांगिनी झाल्या. त्यांनी आप्पांचे घर सावरले. कोंडय़ाचा मांडा केला म्हणून तर आप्पांना वैभवाचे दिवस आले. आप्पा सांगत, माझी पत्नी म्हणजे साक्षात लक्ष्मीरूप आहे. ती आहे म्हणून मी आहे. 1990 मध्ये पालघर तालुका मराठी साहित्य मंडळाची आरेम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली. त्यानंतर डॉ. नेताजी पाटील, पंढरीनाथ तामोरे, जनार्दन पाटील, कमलाकर राऊत, सुधाकर ठाकूर यांनी अध्यक्षपद भूषविले आणि धोंडू पेडणेकर, सच्चिदानंद महाडिक, तुळशीदास तांडेल, विजय पुरव, रमेश पाटील अशा साहित्यिकांनी एकत्र येऊन कविसंमेलन, साहित्यिक चर्चा, परिसंवाद, पुस्तक प्रकाशन, वार्षिक साहित्य मेळावे, वर्षा काव्य संमेलन असे कार्यक्रम गावोगावी केले. पुढे मधुमंगेश कर्णिक यांच्या सहकार्याने पालघर तालुका मराठी साहित्य मंडळाचे यजमानपद स्वीकारून आरेम पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात कोकण मराठी साहित्य परिषदेचे केळवे येथे दुसरे साहित्य संमेलन फार मोठय़ा प्रमाणात यशस्वी झाले. त्यानंतर मधुमंगेश कर्णिक यांनी त्यांना मार्गदर्शक पदावर घेतले आणि प्रा. अशोक रा. ठाकूर, मा. अध्यक्ष आणि प्रमुख पुरस्कार समिती व सदस्य नियामक मंडळ यांना कोमसापमध्ये कार्यरत केले. आरेम पाटील ज्या मातीत रमले, फुलाफळांशी खेळले, बागडले, त्यातूनच त्यांचे मातीत मिळाले मोती (कादंबरी), वणव्यातल्या वेली, कथा दोघांच्या, ऋतू प्रीतीचा, नियतीचा खेळ (कथासंग्रह), मळा, कलंदर, केळफूल, मनुका, भाव मनीचे (काव्यसंग्रह), फणसातले मधुर गरे, आधार वृक्ष, कृतार्थ रघुनाथ, साठवणीतील गुलमोहोर (ललित, चरित्रात्मक), केळव्याची शीतलादेवी (पौराणिक माहितीपर) साहित्य फुलले… बहरले आणि सर्वत्र पसरले. कोकण मराठी साहित्य परिषद, मार्गदर्शक, सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी, पालघर, विश्वस्त, नूतन विद्या विकास मंडळ, केळवे; समाजोन्नती शिक्षण संस्था, मुंबई सोमवंशी क्षत्रिक समाजोन्नती संघ दादर; क्षत्रिय परिषद मुंबई, श्री शीतलादेवी व हनुमान मंदिर केळवे, देवस्थान अशा विविध शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, धार्मिक संस्थांच्या कार्यात अनेक पदे भूषवून ते अखेरपर्यंत क्रियाशीलपणे योगदान देत राहिले. साहित्य चळवळ ग्रामीण भागात रुजविली याबद्दल 1999 साली संस्कार भारती, महाराष्ट्र विभागातर्फे त्यांचा गौरव करण्यात आला. वसई येथे 2001 मध्ये झालेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संमेलनात त्यांच्या साहित्य चळवळीची दखल घेऊन त्यांना वाङ्मयीन कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. अखिल महाराष्ट्र पत्रकार आणि पत्रलेखक संघ राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप 2006 ने त्यांना सन्मानित करण्यात आले. सोमवंशी क्षत्रिय समाजाच्या वसई येथे 2006 या वर्षी झालेल्या पहिल्या वाडवळ साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद त्यांना दिले होते. आज ते आपल्यात नाहीत परंतु त्यांची कविता मनात रुंजी घालते.
ऋतू गेले, वर्षे सरली
मोगरा अजून फुलतो गं
परिमळ तयाचा मज
मंत्र जगण्याचा देतो गं!