1993च्या दंगलीतील फरार आरोपी जेरबंद

1993च्या दंगलीतील फरार आरोपी सय्यद नादीर शाह अब्बास सय्यद याला तब्बल 31 वर्षांनंतर रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. न्यायालयात हजर राहत नसल्याने सय्यदविरोधात अजामिनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. सतत लपून राहणारा सय्यद अखेर पोलिसांच्या हाती लागला.

सय्यदने त्याच्या तीन साथीदारांसह झकेरिया बंदर या ठिकाणी 1993मध्ये झालेल्या दंगलीत जाळपोळ करून लोकांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करून जखमीला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून पळून गेला होता. त्या गुह्यात अटक झाल्यानंतर त्याला जामीन मिळाला. पण त्यानंतर तो तारखेला न्यायालयात हजर राहत नव्हता. त्यामुळे सय्यदविरोधात अजामिनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. तेव्हापासून पोलीस पथक त्याचा शोध घेत होते. अखेर उपनिरीक्षक पल्लवी जाधव तसेच कडलग, लादे, मंडलिक या पथकाने तपास करत शिवडी येथील दगडी मस्जिदजवळ सापळा रचून त्याला पकडले.