विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मिंधे सरकारच्या भ्रष्टाचाराची विरोधी पक्षाकडून चिरफाड केली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तर आज मोठा तुफानी हल्ला करत भूकंप केला. मिंधे-फडणवीस सरकारच्या काळात समृद्धी महामार्गाच्या कामात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. समृद्धीची जबाबदारी ज्यांच्याकडे होती त्या ज्येष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी भ्रष्टाचारातून तीन हजार कोटींची माया जमवली. मोपलवार पुटुंबीय समृद्धी महामार्गातून सर्वाधिक समृद्ध झाले. या घोटाळय़ाची फाईल माझ्याकडे आहे, असे नमूद करत त्याची यादीच रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना फडकवली.
आमदार फोडायला हा पैसा वापरला का?
सनदी अधिकाऱ्याकडे इतका पैसा असेल तर त्या खात्याच्या मंत्र्यांकडेही या माध्यमातून काही पैसे आले होते का आणि जेव्हा राज्यात आमदारांचा बाजार झाला त्यावेळी या समृद्धी महामार्गातून पैसा आला होता का, ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’ त्यातून झाले का, असा प्रश्नही निर्माण होतो. हा भ्रष्टाचार लपवण्यासाठीच सरकार वेगवेगळय़ा योजना आणतेय का, असा सवाल रोहित पवार यांनी केला. एका बाजूने ‘लाडकी बहीण’ योजनेतून महिलांना 1500 रुपये देण्याचे सोंग करायचे आणि दुसरीकडे अधिकाऱ्याला तीन हजार कोटी लाटायला द्यायचे, सरकारी वरदहस्ताशिवाय हे शक्य नाही, असे ते म्हणाले.
राधेश्याम मोपलवार आणि कुटुंबियांच्या संपत्तीची यादीच रोहित पवार यांनी वाचून दाखवली. मोपलवार यांच्या नावावर 1500 कोटींची मालमत्ता आहे. मोपलवार यांच्या दुसऱया बायकोकडे 150 कोटी, तर तिसऱया बायकोकडे 300 कोटींची संपत्ती आहे. एवढेच नाही तर त्यांच्या पहिल्या मुलीकडे 500 कोटी, दुसऱया मुलीकडे 350 कोटी व त्यांचे भाऊ सदानंद मोपलवार यांच्याकडे 200 कोटींची संपत्ती आहे. हा एकूण आकडा तीन हजार कोटींच्या घरात जातो, असे रोहित पवार म्हणाले.
राधेश्याम मोपलवार यांनी त्यांच्या 26 वर्षांच्या सरकारी सेवेत तीन हजार कोटींची माया जमवली असून ती देशात आणि परदेशात आहे. त्यांनी याबाबतीत उद्योगपती अदानी व अंबानींनाही मागे टाकले आहे. समृद्धीच्या कामातून सर्वसामान्यांची समृद्धी झाली की मोपलवारांसारख्या अधिकाऱ्यांची?
– रोहित पवार
टेंडर मिळालेल्या कंपनीतील मोपलवार कुटुंबियांचे शेअर्स
– कंपनीचे एकूण शेअर्स 1 कोटी 52 लाख
– मोपलवार कुटुंबियांकडे असलेले शेअर्स 23 लाख
– मोपलवार यांची मुलगी तन्वी मोपलवार 3 लाख 98 हजार शेअर्स
– भाऊ सदानंद मोपलवार 23 हजार 645 शेअर्स
– हुजूर मल्टी प्रोजेक्टचे 4 लाख 98 हजार शेअर्स असणारी मेलोरा इन्फ्रा कंपनी तन्वी मोपलवार हिच्या नावावर
हुजूर मल्टी प्रोजेक्ट कंपनीला पायघडय़ा
1 2018 मध्ये समृद्धी महामार्गाचे 49 हजार कोटी रुपयांचे टेंडर काढले होते.
2 अवघ्या चार महिन्यांनंतर त्या टेंडरची किंमत 6 हजार 88 कोटी रुपयांनी वाढवून 55 हजार कोटी रुपये केली.
3 समृद्धी महामार्गाच्या पॅकेज क्रमांक 11 चे काम सरकारने गायत्री प्रोजेक्टला दिले. ते टेंडर 1900 कोटींचे होते, पण सदर कंपनीने 2021 मध्ये आपल्याला हे काम जमणार नसल्याचे सांगितले.
4 नंतर कामाची किंमत 800 कोटींनी वाढवून हेच काम हुजूर मल्टी प्रोजेक्टला देण्यात आले. ही हुजूर मल्टी प्रोजेक्ट कंपनी कुणाची याच्या खोलात जाण्याची गरज आहे, असे रोहित पवार म्हणाले.
मिंधे-फडणवीसांनी मोपलवारांना बनवले देशातील श्रीमंत सरकारी अधिकारी
राधेश्याम मोपलवार आजघडीला देशातील श्रीमंत सरकारी अधिकारी म्हणून ओळखले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. पण 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर तात्पुरती कारवाई केली आणि पुन्हा त्यांच्याच खांद्यावर मोठी जबाबदारी दिली, असे रोहित पवार म्हणाले. मोपलवार निवृत्त झाल्यानंतरही विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आपल्या वॉररूमचे प्रमुख बनवले, असेही रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या निदर्शनास आणले.