राधानगरीतील लोंढा नाला प्रकल्प ओव्हरफ्लो

राधानगरी  तालुक्यातील केळोशी बुद्रूक येथील लोंढा नाला लघुपाटबंधारे प्रकल्प आज सकाळी सात वाजता ओव्हरफ्लो होऊन वाहू लागला.

खामकरवाडी लघुपाटबंधारे प्रकल्पानंतर सुमारे एक टीएमसीपेक्षा अधिक पाणी साठवण क्षमता असलेला हा राधानगरी तालुक्यातील दुसरा लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला.

प्रकल्पातील ओव्हरफ्लो झालेले पाणी थेट धामोड येथील तुळशी जलाशयात येते. यामुळे तुळशी प्रकल्प जलदगतीने भरण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे. आज दिवसभरात या परिसरात 100 मि.मी. पाऊस झाल्यामुळे या प्रकल्पाची पाणीपातळी वेगाने वाढली आहे. प्रकल्पामुळे केळोशी बुद्रूक, कुंभारवाडी, सुतारवाडी, वळवंटवाडी, अवचितवाडी, जाधववाडी व कुरणेवाडी या गावांतील 150 हेक्टरहून अधिक क्षेत्र ओलिताखाली आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा प्रकल्प 10 दिवस उशिराने भरला आहे. या प्रकल्पाच्या सांडव्यावरून 200 क्युसेकने पाणी तुळशी धरणामध्ये येत असल्याने तुळशी प्रकल्प वेगाने भरण्यास मदत होणार आहे.