मराठी माणूस जगभरात पोहोचला पण सिनेमाचे विषय तेच ते! आर. माधवनची खंत

‘मराठी माणूस जगभरात पोहोचला, पण मराठी सिनेमांचे विषय तेच ते आहेत, अशी खंत अभिनेता आर. माधवन याने व्यक्त केली.

आर. माधवनचा ‘हिसाब बराबर’ सिनेमा ‘झी फाइव्ह’वर येत आहे. त्यामध्ये आर. माधवन ‘राधेमोहन शर्मा’ या सामान्य माणसाची भूमिका साकारत आहे. या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर त्याने मराठी सिनेमा आणि कोल्हापूरच्या आठवणी सांगितल्या. या चित्रपटात मी रेल्वेतील तिकीट तपासनीसाची भूमिका निभावतोय, खऱया आयुष्यातही मला रेल्वेतून प्रवास करणं खूप आवडतं. कॉलेजमध्ये असताना बराच काळ मी मुंबई-पुणे-कोल्हापूर असा प्रवास महालक्ष्मी एक्प्रेसने करायचो. आता कोल्हापूर बरंच बदललंय, विकसित झालंय. या शहराबद्दल माझ्या मनात खूप प्रेम आहे, असे माधवन म्हणाला. सामान्य माणसांमध्ये एक असामान्यत्व दडलेलं असतं. त्याचा शोध घेऊन त्यावर मेहनत घेणारी माणसं कायमच मला प्रेरणा देतात, असे त्याने सांगितले.

– कोल्हापुरात शिक्षण झाल्यामुळे मला मराठी समजतं. कामातून वेळ मिळाला की, मी आवर्जून मराठी चित्रपट, मालिका बघतो. मराठीत खूप कसलेले, जिवंत अभिनय करणारे नट आहेत. उत्कृष्ट दर्जाचे मराठी चित्रपट सध्या तयार होताहेत. मात्र मराठी माणूस जगभरात पोहोचलाय, पण मराठी चित्रपटांचे विषय अजूनही स्थानिकच आहेत, ही एकच खंत वाटते!