पोखरण अणुचाचणीचे शिल्पकार डॉ. आर. चिदंबरम यांचे निधन

हिंदुस्थानने 1974 मध्ये पोखरणमध्ये घेतलेल्या पहिल्या अण्वस्त्र्ा चाचणीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणारे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. आर. चिदंबरम यांचे निधन झाले. 1998 च्या दुसऱया अणुचाचणीमध्येही त्यांचे योगदान होते. देशाच्या वैज्ञानिक प्रगतीत मोठे योगदान देणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड गेला आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. राजगोपाल चिदंबरम यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे 3.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ते 88 वर्षांचे होते. डॉ. आर. चिदंबरम यांचा जन्म 1936 मध्ये तामीळनाडूत झाला. चेन्नईतील प्रेसिडेन्सी कॉलेज आणि बंगळुरूतील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस येथून भौतिकशास्त्रत पदव्युत्तर शिक्षण घेतले. अणुऊर्जा क्षेत्रात त्यांनी मोठे कार्य केले. अनेक विद्यापीठांकडून त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. 1975 मध्ये डॉ. आर. चिदंबरम यांना पद्मश्री आणि 1999 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.