नांदूरमध्यमेश्वरच्या जलाशयावर देशी-विदेशी पाहुण्यांचे आगमन

तालुक्यातील कोपरगाव नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्याच्या विस्तीर्ण जलाशयाच्या परिसरात देशी- विदेशी पक्ष्यांच्या आगमनास सुरुवात झाली आहे. कच्छच्या रानातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर यावर्षी फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झाले आहे. पक्षी परीक्षणाची आता मोठी पर्वणी निर्माण आली आहे.

गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर इ.स. १९११च्या सुमारास नांदूरमध्यमेश्वर दगडी बंधारा बांधण्यात आला आहे, त्यामुळे निर्माण झालेल्या जलाशयाच्या परिसराला, इ.स. १९८६ मध्ये अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. १००.१२ चौ.कि.मी. क्षेत्रात पसरलेल्या या अभयारण्यास जगप्रसिध्द पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनी महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून या भागाला गौरविले आहे. नांदूरमध्यमेश्वर येथील पक्ष्यांच्या अधिवासामुळे तसेच दुर्मिळ पक्ष्यांच्या अस्तित्वामुळे हे क्षेत्र महत्त्वपूर्ण पक्षीक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. दरवर्षी या पक्षी अभयारण्यात १५ नोव्हेंबरनंतर परदेशी पाहुण्यांचं आगमन होते. पण, यंदा जास्त दिवस चाललेल्या पावसाने पक्षी आगमनाचा हंगाम साधारणतः दहा ते पंधरा दिवस पुढे ढकलला आहे.

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात विरळ सदाहरित जंगल आणि माळरान परिसर आढळून येतो. ४०० हून अधिक विविध प्रकारच्या वनस्पती प्रजाती येथे बघायला मिळतात. वेगवेगळ्या पाणवनस्पती, आसपासची हिरवीगार शेती, नदी किनाऱ्यावरची वनराई या बाबी देशी-विदेशी पक्ष्यांना आकर्षिक करतात. विस्तीर्ण जलाशयामुळे गाळ, दलदल, गाळ साठून नदीपात्रात उंचवटे तयार झाले आहेत. पक्ष्यांना खाद्य म्हणून आवश्यक मासे, शेवाळ, दलदलीतील कीटक येथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे येथे पक्ष्यांची संख्या वाढत आहे.

पक्ष्यांच्या स्थलांतराच्या काळात येथे सुमारे ३५ हजार पक्षी आढळत असल्याची नोंद आहे. हिवाळ्यात रोहित, चक्रवाक, तलवार बदक, लालसरी, चतुरंग, सुरय, कादंब, झोळीवाला, करकोचे, शराटी, तुतारी, क्रौंच, गल, चिलखे, कुरल, हरिण इत्यादी पाणपक्षी भेट देत असतात. चमचा बदक, बगळे, चांदवा, कमळपक्षी, पाणकोंबडी, मुग्धवलाक, खंड्या, ससाणे, पाणबुडी हे स्थानिक पक्षी बघायला मिळतात.

येथे पक्षी निरीक्षणासाठी निरीक्षण मनोरे, स्पोटिंग स्कोप अशा सुविधा उपलब्ध आहेत. येथे पक्षी निरीक्षणासाठी पॅडल बोट अभयारण्य व्यवस्थापनेकडून उपलब्ध करून दिली जाते. परंतु, जलाशयातील पाण्याची पातळी आणि पक्षी जलाशयात विहार करीत असल्यास ही बोट उपलब्ध नसते. चापडगाव येथील स्वागतकक्षात फिल्ड गाईड, दुर्बीण आणि मार्गदर्शक उपलब्ध असतात. पर्यटकांना मुक्काम करण्यासाठी किंवा सूर्योदय आणि सूर्यास्त बघायचा असेल, तर अभयारण्यालगतच खानगाव थडी येथे पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहाची व्यवस्था आहे. पक्षी निरीक्षणासाठी डिसेंबर ते फेब्रुवारी हा उत्तम कालावधी मानला जातो.