न्यायालयीन कोठडीत मरण पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाल्याचा पर्दाफाश शवविच्छेदन अहवालाने केला आहे. सोमनाथच्या अंगावर अनेक जखमा आढळल्याचे या अहवालात स्पष्ट म्हटले आहे. दरम्यान, सोमनाथ याच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जमावाने पोलिसांविरोधात घोषणा दिल्या. दरम्यान, या मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ परभणी जिल्हय़ात कडकडीत बंद पाळण्यात आला. मुंबईसह राज्यभरात निदर्शने झाली तर विधिमंडळातही तीव्र पडसाद उमटले.
परभणी येथे गेल्या आठवडय़ात संविधानाच्या विटंबनेवरून दंगल उसळली. या दंगल प्रकरणात पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी याला अटक केली होती. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कोठडीत असतानाच त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या अमानूष मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप दलित समाजाने केला. मात्र पोलिसांनी मारहाण केल्याचे नाकारले. हृदयविकाराच्या धक्क्याने सोमनाथचा मृत्यू झाल्याचा दावाही पोलिसांनी केला. सोमनाथच्या मृत्यूवरून परभणीत तणाव असतानाच त्याचे शवविच्छेदन नांदेड येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु दलित नेत्यांनी या निर्णयाला विरोध केला.
छत्रपती संभाजीनगर येथे घाटी रुग्णालयात सोमनाथच्या मृतदेहाची न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली इन कॅमेरा उत्तरीय तपासणी करण्यात आली. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात सोमनाथच्या अंगावर अनेक जखमा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ‘शॉक फॉलोइंग मल्टिपल इन्जुरीज’ असे त्याच्या मृत्यूचे कारणही देण्यात आले आहे. अंगावर जखमा आढळल्याने मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाला नाही हा पोलिसांचा दावा खोटा असल्याचे आपोआपच स्पष्ट झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
पोलिसांची हाराकिरी
शवविच्छेदनानंतर सोमनाथ सूर्यवंशीचे पार्थिव छत्रपती संभाजीनगर येथून परभणीकडे मार्गस्थ झाले. मात्र परभणीत अंत्यसंस्कार झाल्यास वातावरण आणखी चिघळण्याची भीती दाखवून पोलिसांनी पाचोड येथेच पार्थिव अडवले. अंत्यसंस्कार परभणीत न करता इतर ठिकाणी करावा, अशी दमबाजी पोलिसांनी केली. त्यामुळे दीड तास वाहनांचा काफिला पाचोडलाच थांबलेला होता. प्रकाश आंबेडकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून अंत्यसंस्कार परभणीतच होणार, असे ठणकावून सांगितल्यानंतर हा काफिला पुढे मार्गस्थ झाला.
मुंबईत तीव्र निदर्शने
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचे तीव्र पडसाद मुंबईतही उमटले. शीव कोळीवाडा येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संवर्धन संमिती आणि जेतवन बुद्ध विहाराच्या वतीने सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळवून देण्यासाठी निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या निषेध रॅलीत अध्यक्षा वत्सला हिरे, सेव्रेटरी विलास कांबळे, बाळा केदारे, सुरेश बागुल, दीपक काबंळे, बबन राजापकर, डॉ. प्रबोध गायकवाड, उत्तम आढाव, युवा सेना अधिकारी शुभम जाधव, विधानसभा संघटक गजानन पाटील सहभागी झाले होते. चेंबूर, घाटकोपर येथेही तीव्र निदर्शने करण्यात आली.
ठाणे, भिवंडीत आंदोलन; पनवेलमध्ये बंद
ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने निदर्शने करीत सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य रॅलीही काढण्यात आली. भिवंडीतदेखील आरपीआय एकतावादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विकास निकम यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयात निवेदन दिले. सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या आरोपींना अटक करून त्यांना फाशी द्या, अशी मागणी या वेळी केली.
शोकसंतप्त वातावरणात अंत्यसंस्कार
न्यायालयीन कोठडीत मरण पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर सोमवारी सायंकाळी शोकसंतप्त वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराच्या वेळी संतप्त जमावाने पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यासह आंबेडकरवादी अनुयायी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप हेसुद्धा हजर होते.
बीड आणि परभणीच्या घटनेचे तीव्र पडसाद आज विधान भवनाच्या पायऱ्यांपासून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले. राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून मराठवाडय़ातील या दोन जिह्यांत या घटना घडल्याचे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना पटोले यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे यावर चर्चेची मागणी केली. यावर उद्या चर्चा करण्याची तयारी सरकारने दर्शवली असून या दोन्ही घटनांवरून सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता आहे.
मराठवाडय़ात कडकडीत बंद
सोमनाथ सूर्यवंशीवर करण्यात आलेल्या पोलीस अत्याचाराच्या निषेधार्थ परभणी, नांदेड, हिंगोली जिल्हय़ासह छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशीव, लातूर जिल्हय़ात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंददरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र मानवत येथे बस आणि कापसाच्या टेम्पोवर दगडफेक करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरात क्रांती चौकात दलित कार्यकर्त्यांनी टायर जाळून निषेध केला.