मृतदेहाशेजारी बसून 4 तास विमान प्रवास! जोडप्याने सांगितला भयंकर अनुभव

आयुष्यात एकदा तरी विमानाने प्रवास करावा, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. विमानात बसणाऱ्या प्रत्येकाला चांगले- वाईट अनुभव येत असतात. असाच एक भयंकर अनुभव एका जोडप्याला आला आहे. 15 तासांच्या प्रवासात एका जोडप्याला तब्बल 4 तास एका मृतदेहाच्या शेजारी बसावे लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, जेनिफर कॉलिन मेलबर्न असे त्या महिलेचे नाव असून मिशेल रिंग असे तिच्या पतीचे नाव आहे. या दोघांनीही विमान प्रवासातील आपला अनुभव सांगितला आहे. जेनिफर आणि तिचा नवरा मिशेल हे ऑस्ट्रेलियातील मेलबर्नहून दोहाला प्रवास करत होते. 15 तासांचा हा प्रवास होता. यावेळी अचानक विमानातील एका महिलेची तब्येत बिघडली. त्यामुळे ती चक्कर येऊन पडली, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, विमानात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी महिलेला ताबडतोब उचलले आणि तिला शुद्धीवर आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. मात्र, अथक प्रयत्नांनंतरही महिलेचा जीव वाचू शकला नाही. महिलेच्या अशा प्रकारे मृत्यू झाल्यामुळे विमानातील प्रत्येक प्रवाशी घाबरला होता. विमान प्रवास सुरू असल्यामुळे मृतदेह कुठे ठेवायचा? असा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी जेनिफर आणि तिचा नवरा मिशेल हे चार लोकांच्या सीटवर बसले होते. त्यामुळे त्यांच्या बाजूच्या 2 सीट रिकाम्या होत्या. त्यामुळे विमानातील कर्मचाऱ्यांनी महिलेचा मृतदेह जेनिफर आणि मिशेल यांच्या बाजूच्या सीटवर आणून ठेवला. त्यामुळे उरलेले 4 तास या जोडप्याला मृतदेहासोबत प्रवास करावा लागला, असे त्यांनी सांगितले.

जेनिफर आणि मिशेल यांना आलेल्या या भयानक अनुभवाचा सगळ्यांनाच धक्का बसला आहे. ही घटना संपूर्ण देशभरात पसरली असून कतार एअरवेजने या घटनेबाबत त्यांची माफी देखील मागितली आहे. विमानातील असुविधा आणि प्रवाशांना होणाऱ्या त्रासासाठी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.