>>रविप्रकाश कुलकर्णी
आपल्या देशात कलावंताला मोठं व्हायचं असेल तर तो मरायला लागतो. यात किती तथ्य आहे हे ज्याचं त्यांनी ठरवावं, पण चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते गुरुदत्त यांच्या बाबतीत ते नक्कीच खरं आहे.
गुरुदत्त यांचं निधन 10 ऑक्टोबर 1964 मध्ये झालं, पण गुरुदत्तचं मोठेपण सांगणारं पहिलं पुस्तक प्रकाशित व्हायला 1973 उजाडायला लागलं. लेखक होते फिरोज रंगूनवाला. मात्र त्यानंतर कमी जास्त प्रमाणात गुरुदत्त यांच्या व्यावसायिक आणि कलावंत म्हणून मूल्यमापनाला थोडीफार सुरुवात झालेली दिसते. भाऊ पाध्ये यांनी ‘ये दुनिया अगर मिल भी जाए’ असा ‘माणूस’ दिवाळी अंक 1972 मध्ये कलावंत गुरुदत्त यांचा वेध घेतलेला होता. ज्याचे पुढे लोकवाङ्मय प्रकाशनने याच नावाने पुस्तक प्रकाशित केलं. इस्मत चुगताई यांनी ‘अजीब आदमी’ कादंबरीत ‘गुरुदत्त- एक माणूस आणि कलावंत’ असा वेध घेतलेला दिसतो. त्यानंतर हळूहळू गुरुदत्त यांच्या चित्रपटांचा पटकथा, संवाद लेखक अबरार अली यांनी दिलेल्या मुलाखतीच्या आधारे इसाक मुजावर, सत्या शरण यांनी पुस्तकं लिहिली. नसरीन मुन्नी कबीर, अरुण खोपकर, कृपाशंकर शर्मा यांची चरित्रंदेखील उल्लेखनीय आहेत. या पुस्तकांमुळे आणि गुरुदत्त यांचे चित्रपट नव्याने प्रदर्शित केल्याने गुरुदत्त यांच्याबद्दल कुतूहल वाढतच राहिलं.
अशातच एक पत्रकार सुधीर नांदगावकर यांनी ‘गुरुदत्त- एक माणूस आणि कलावंत’ असा मागोवा घेणाऱया आणि अनेकांनी लिहिलेल्या लेखांचं पुस्तक संपादित केलं आहे. (गुरुदत्त – ग्रंथाली प्रकाशन). त्यानंतरही त्यांचा हा शोध चालू होता. त्यासाठी उपलब्ध असलेली सर्व पुस्तकं त्यांनी संदर्भासाठी वापरली. त्यांचं लेखन सुरू झालं, पण त्यावर शेवटचा हात फिरवण्याआधीच त्यांचं दुःखद निधन झालं. अर्थात त्यामुळे त्यांच्या गुरुदत्त यांच्यावरील लिखाणाचं काय होणार? हा प्रश्न निर्माण झाला.
परंतु राजहंस प्रकाशनने पुढाकार घेऊन जाणते लेखक श्रीकांत बोजेवार यांना संपादनाची जबाबदारी देऊन आता ‘प्यासा’ या शीर्षकाखाली पुस्तक प्रकाशित झालं आहे. यासंबंधात ते लिहितात, ‘गुरुदत्त यांचे निस्सीम चाहते असलेल्या सुधीर नांदगावकर यांनी प्रस्तुत पुस्तकाच्या लेखनासाठी या सर्व पुस्तकांपेक्षा थोडा निराळा, चरित्र-कादंबरी-जीवन-प्रवास असा एक संमिश्र घाट स्वीकारला आहे.
हे लेखन वाचल्यावर जी माहिती मिळते, त्यातून गुरुदत्त यांच्या आयुष्यातील एरवी फार लिहिल्या बोलल्या न गेलेल्या घटनांचे तपशील, त्याच्या जगण्याचे, चित्रपट निर्मितीचे, विचार प्रक्रियेचे काही नवे पैलू आपल्याला कळतात.
असे हे गुरुदत्त अवघ्या 39 व्या वर्षी (10 ऑक्टोबर 1964) जग सोडून गेले. यासंबंधात श्रीकांत बोजेवार म्हणतात, त्यांचा मृत्यू ही आत्महत्या होती की अपघात होता, याभोवती अजूनही संशयाचं गडद धुकं दाटलं आहे. मनस्वी कलावंत, यशस्वी गायिका असलेली पत्नी, वहिदा रहमानसारख्या प्रतिभाशाली अभिनेत्रीसोबतच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधांची चर्चा, चित्रपटातील प्रतिमांमुळे लाभलेलं गूढ वलय, आत्महत्येचे अयशस्वी प्रयत्न आणि शेवटी अल्प वयात झालेला आकस्मिक मृत्यू… या सर्व घटकांना काव्यमय स्वरूप प्राप्त करून द्यायचं तर गुरुदत्त यांच्या मृत्यूला ‘आत्महत्या’ म्हणणं अधिक सोयीचं आहे. त्यामुळेच त्याच्याविषयी लिहिताना आत्महत्येचा घटक हा अपघाती मृत्यूच्या शक्यतेवर नेहमीच मात करत आलेला आहे.’
मात्र लेखक सुधीर नांदगावकर यांना गुरुदत्त यांनी आत्महत्या केली हे कधीच मान्य नव्हतं. एखाद्याला मत मांडायचा अधिकार असू शकतो. तसा तो आपण मान्य करू या, पण त्यासाठी लेखक जी कारणं वा दाखले देतो, ते पुरेसे ठरत नाहीत. त्यामुळे ते फक्त लेखकाचं आंधळं प्रेम आहे एवढाच अर्थ निघतो. त्यामुळेच संपादक बोजेवार यांनी म्हटल्याप्रमाणे, एकाच वेळी अनेक नव्या गोष्टी कळल्याचं समाधान आणि कळीच्या प्रसंगात खोल पाण्यात न शिरल्याचं थोडंसं समाधान अशा संमिश्र भावना हे पुस्तक वाचताना निर्माण होतात. मात्र गुरुदत्त यांच्या जन्मशताब्दी वर्षात (जन्म 9 जुलै 1925) प्रकाशित झालेलं ‘प्यासा’ हे पुस्तक गुरुदत्त यांच्या चाहत्यांच्या अनेक आठवणी जाग्या करेल. त्यासाठी हे पुस्तक वाचायला हवं.