चित्रपटाच्या आधी जाहिरात दाखवणे पीव्हीआर व आयनॉक्सला भोवले, तक्रारदाराला 65 हजार नुकसानभरपाई देण्याचे ग्राहक न्यायालयाचे आदेश

चित्रपट बघायला गेल्यानंतर पीव्हीआर आणि आयनॉक्समध्ये वेगवेगळ्या जाहिराती दाखवल्या जातात, परंतु अतिरिक्त जाहिराती दाखवणे बंगळुरूमधील पीव्हीआर व आयनॉक्सला चांगलेच महागात पडले आहे. बंगळुरूमधील एका तरुणाने पडद्यावर 25 मिनिटांच्या जाहिराती दाखवल्याने माझा वेळ वाया गेला असे सांगत पीव्हीआर सिनेमागृहाविरोधात ग्राहक न्यायालयात धाव घेत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत ग्राहक न्यायालयाने तक्रारदाराला 65 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी असे आदेश संबंधितांना दिले आहेत. अभिषेक एमआर असे या तरुणाचे नाव असून त्याने 26 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 4.05 वाजेच्या शोसाठी ‘सॅम बहादूर’ या चित्रपटाचे तीन तिकीट बुक केले होते. चित्रपट 6.30 वाजता संपेल. त्यानंतर मी माझ्या कामावर परत जाईल, अशी योजना त्याने आखली होती, परंतु हा चित्रपट साडेचार वाजता सुरू झाला. म्हणजेच चित्रपटापूर्वी जाहिराती आणि चित्रपटाचे ट्रेलर दाखवण्यात आले. यामुळे माझा 30 मिनिटांचा वेळ वाया गेला असे अभिषेक यांनी म्हटले होते.

नुकसानभरपाई देण्याचे आदेश

ग्राहक न्यायालयाने पीव्हीआर सिनेमा आणि आयनॉक्सला तक्रारदाराला नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले. तक्रारदारांचा वेळ वाया गेल्याने 50 हजार रुपये, मानसिक त्रास झाल्यामुळे 5 हजार रुपये आणि तक्रार दाखल करणे व अन्य खर्चासाठी 10 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कोर्टाने पीव्हीआर सिनेमा आणि आयनॉक्सवर एक लाख रुपयाचा दंडसुद्धा ठोठावला आहे.

अमूल्य वेळ वाया गेला

तक्रारदार अभिषेक यांच्या म्हणण्यानुसार, पीव्हीआर सिनेमागृहाने 25 ते 30 मिनिटांच्या जाहिराती दाखवल्याने माझा अमूल्य वेळ वाया गेला. जाहिराती दाखवण्यासाठी चित्रपटगृहाने सिनेमाची वेळ चुकीची दाखवली होती. त्यामुळे मला माझ्या वेळेचा मोबदला मिळावा, अशी मागणी ग्राहक न्यायालयाकडे केली. तक्रारदाराचे म्हणणे ऐकून घेत ग्राहक न्यायालयाने अभिषेक यांना 65 हजारांची नुकसानभरपाई मिळावी, असे पीव्हीआरला निर्देश दिले आहेत.