हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने गुरुवारी डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. 18व्या मानांकित सिंधूने 63 मिनिटांपर्यंत रंगलेल्या लढतीत सातव्या मानांकित चीनच्या हान यू हिचे कडवे आव्हान 18-21, 21-12, 21-16 असे मोडून काढले.
दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूने चुरशीचा पहिला गेम गमविल्यानंतर चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. मात्र, दुसऱया गेममध्ये सिंधूने 11-6 अशी मुसंडी मारत चिनी खेळाडूवर दडपण वाढविले. मग हा गेम 21-12 असा जिंकून लढतीत पुनरागमन केले. त्यानंतर तिसरा अन् निर्णायक गेममध्ये एकएक गुणसाठी उभय खेळाडूंमध्ये पाठशिवणीचा खेळ बघायला मिळाला. 7-7 अशा बरोबरीनंतर 11-11 पर्यंत त्यांच्यात चुरस रंगली होती. मग सिंधूने 19-16 अशी आघाडी घेत हान यूला पिछाडीवर टाकले. त्यानंतर सलग दोन गुणांची कमाई करीत हिंदुस्थानी खेळाडूने विजयावर शिक्कामोर्तब केले. हान यू हिच्यावर सिंधूचा हा सातवा विजय ठरला. या स्पर्धेत हिंदुस्थानचे इतर सर्व खेळाडू पहिल्या फेरीतच पराभूत झालेले असून, पी. व्ही. सिंधूच्या रूपाने स्पर्धेत देशाचे एकमेव आव्हान शिल्लक आहे.