अल्लू अर्जुनला जामीन मिळणार की तुरुंगात जावं लागणार? न्यायालय ‘या’ दिवशी सुनावणार निर्णय

पुष्पा – 2 च्या स्क्रिनिंगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. तसेच एका बालकाला झालेल्या दुखापतीच्या प्रकरणात सहभागी असलेला चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुन याच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी झाली. न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. न्यायालय आता 3 जानेवारीला निकाल सुनावणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये अभिनेता अल्लू अर्जुनला आरोपी क्रमांक 11 म्हणून नाव देण्यात आले आहे.

याआधी अल्लू अर्जुनला 13 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती आणि 14 डिसेंबर रोजी तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याला चार आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. 27 डिसेंबर रोजी अल्लू व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर झाला होता. यातच आज नियमित जामिनासाठी त्याच्या अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा-2 चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान ही घटना घडली. चेंगराचेंगरीत एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा मुलगा श्रतेज जखमी झाला होता. अभिनेता अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी येथे मोठी गर्दी केली होती. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली.