बॉक्स ऑफिसवर पुष्पा राज; पहिल्याच दिवशी जगभरात 294 कोटींची, तर देशात 175 कोटींची बंपर ओपनिंग

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन याच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटाने कमाईचे सारे विक्रम तोडले असून बॉक्स ऑफिसवर आता केवळ ‘पुष्पा’राज पाहायला मिळतेय. नॉन हॉलिडेला रिलीज होऊनदेखील या चित्रपटाने जगभरात 294 कोटींची, तर देशभरात 175 कोटींची ओपनिंग मिळवली आहे. त्यापैकी हिंदी डबमध्ये 72 कोटी रुपये कमावले आहेत. हिंदीत पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱया शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाचा रेकॉर्डदेखील या चित्रपटाने तोडला आहे. ‘जवान’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी 65 कोटी रुपयांची कमाई केली होती.

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या गाजलेल्या ‘पुष्पा’ या चित्रपटाचा ‘पुष्पा 2’ हा सिक्वेल असून या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट कमाईचे सारे रेकॉर्ड ब्रेक करेल याची सर्वांनाच खात्री होती. पहिल्या दिवसापासूनच कश्मीर ते कन्याकुमारी सर्वत्र ‘पुष्पा’ची जादू पाहायला मिळतेय. अगदी अमेरिकेतदेखील ऍडव्हान्स बुकिंगला तुफान प्रतिसाद मिळाला. सलग तीन दिवस जोडून आलेल्या सुट्टय़ांमुळे चार दिवसांत हा चित्रपट 500 कोटींचा आकडा सहज गाठणार यात शंका नाही.

हिंदीत सर्वाधिक ओपनिंग मिळवणारे चित्रपट
पुष्पा 2 72 कोटी
जवान 65.50 कोटी
स्त्राr 2 55.40 कोटी
पठाण 55 कोटी
ऍनिमल 54.75 कोटी

वांद्रे येथे शोदरम्यान फवारला विषारी गॅस

वांद्रे येथील गॅलेक्सी थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ चा शो सुरू असताना अज्ञात व्यक्तीने विषारी गॅस फवारल्याने अनेक प्रेक्षकांना खोकला, घशात जळजळ आणि उलटय़ा झाल्याचे वृत्त आहे. या प्रकरणानंतर चित्रपटाचे प्रक्षेपण 15 ते 20 मिनिटे थांबवण्यात आले होते. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहे.

सिनेमा बघायला गेला अन् घरी परतलाच नाही

बंगळुरूच्या बाशेट्टीहळ्ळी येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. 19 वर्षीय तरुणाचा रेल्वे ट्रक ओलांडताना ट्रेनखाली येऊन मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परवीन आणि त्याचे दोन मित्र गांधीनगरमधील वैभव थिएटरमध्ये सकाळी 10 वाजता होणाऱया ‘पुष्पा 2’ च्या शोसाठी जात होते. बाशेट्टीहळ्ळी येथे रेल्वे ट्रक पार करताना परवीनला भरधाव ट्रेनची धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यापूर्वी ‘पुष्पा 2’ च्या प्रीमियरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी अल्लू अर्जुन आणि संध्या थिएटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.