माझ्या कारकीर्दीच्या सुवर्ण महोत्सवी टप्प्यावर जीवनगौरव पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. कार्यरत असताना मिळालेला हा जीवनगौरव अजून चांगले काम करायला बळ देणारा आहे, असे भावोद्गार लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी विठ्ठल उमप फाऊंडेशनच्या प्रतिष्ठेच्या ‘मृद्गंध पुरस्कार’ वितरण प्रसंगी काढले.
आपले अवघे आयुष्य लोककलेसाठी समर्पित करणाऱया लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ‘मृद्गंध पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. नुकताच 14 वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृद्गंध पुरस्कार’ सोहळा ठाणे येथील काशीनाथ घाणेकर सभागृहात रंगला. ‘खंडोबाचं लगीन’ या नाटकादरम्यान लोकशाहीर विठ्ठल उमप यांची ओळख झाली आणि आज त्या नाटकातील काही मंडळीच्या साक्षीने हा पुरस्कार मिळतोय हा वेगळा आनंदसुद्धा आहे. अतिशय दृष्ट लागण्यासारखा हा सोहळा आयोजित केल्याबद्दल नंदेश उमप आणि सरिता उमप यांचे मनापासून काwतुक करत पुरुषोत्तम बेर्डे यांनी या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी तौफिक कुरेशी (झेंबे वादक) आणि ग्रुप पं. विजय चव्हाण व ग्रुप (महाराष्ट्राची वाद्य) यांच्या सुमधुर संगीताची मेजवानी तसेच विशाल कृष्णा यांच्या कथ्थक नृत्याचा आस्वाद रसिकांनी घेतला. या बहारदार कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
आदेश बांदेकर, सुरेखा पुणेकर यांचाही गौरव
या सोहळ्यात सुरेखा पुणेकर (लोककला), गौरी सावंत (सामाजिक क्षेत्र), आदेश बांदेकर (अभिनय व सूत्रसंचालन), सुचित्रा बांदेकर (अभिनेत्री), रोहित राऊत (नवोन्मेष प्रतिभा-संगीत क्षेत्र), दीपाली देशपांडे (क्रीडा क्षेत्र) आणि ज्ञानेश महाराव (लेखक व पत्रकार) यांना ‘मृद्गंध पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. कलेच्या प्रवासात अनेक आश्वासक हात पाठीवर पडले त्यातला एक हात शाहीर विठ्ठल उमप यांचा होता. हा पुरस्कार नाही तर आशीर्वाद असल्याचे आदेश बांदेकर यांनी यावेळी सांगितले.