पुणतांबा ते कान्हेगाव रेल्वेमार्गाची चाचणी यशस्वी; रेल्वे द्रुतगतीमुळे नगरचा रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट

नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत पुलतांबा ते कान्हेगाव या 8.66 कि.मी. अंतराची चाचणी मंगळवारी घेण्यात आली. लवकरच नगर ते मनमाडपर्यंतचे काम पुर्ण होणार असल्याने नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. या पुर्ण मार्गात इलेक्ट्रीक इंजीनचा वापर होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून नगर ते मनमाड द्रुतगती (डबललाईन ) रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. या पूर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई , अंकाई ते अंकाई किल्ला ,अंकाई किल्ला ते मनमाड ,कोपरगाव ते कान्हेगाव,बेलापूर ते पुणतांबा,बेलापूर ते पढेगाव,निबळक ते वांबोरी या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. आता मंगळवारी 8 .66 कि.मी. डबल लाईन रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात आली. आता ऐकूण 115 किमी अंतराची चाचणी पूर्ण झाल्याची माहिती उप मुख्यअभियंता (बांधकाम) नगर दीपक कुमार यांनी दिली.

मनमाड ते दौंड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्वपूर्ण टप्पा येतो. मात्र, हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे रेल्वेगाडीचा वेग कमी होता. तसेच सिंगललाईनमुळे अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबा घ्यावा लागत होता. तासोनतास रेल्वे गाडी एकाच जाग्यावर थांबत होती. मात्र, आता हा पूर्ण मार्ग इलेक्ट्रीक इंजिनचा वापर करून डबललाईन करण्यात येत असल्यामुळे विनाकारण रेल्वेगाडयांचा थांबा आता बंद होणार आहे. पुणतांबा ते कान्हेगाव या द्रुतगती रेल्वे मार्गावर गोदावरी नदीवरील लांबी 288 मीटर व उंची 18 मीटर लांबीचा असलेले सर्वात मोठा पुल बांधण्यात आला आहे. हा रेल्वे पुल बनवण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागला असून नगर ते मनमाड रेल्वे द्रुतगती मार्गामधील सर्वात मोठया लांबीचा व उंचीचा पूल असून या पुलामुळे नगर-मनमाड रेल्वे गाड्या धावण्यासाठी बळकटी मिळाली आहे.

या कामामुळे रेल्वे ताशी 130 प्रति किमी वेगाने धावणार असल्याने रेल्वेगाडी धावण्याचा वेगही सुपरफास्ट होणार आहे. तीन वर्षापासुन हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसऱ्या टप्प्यात नगर ते दौंड पर्यंत काम पूर्ण होणार आहे. मंगळवारी झालेल्या चाचणीत या द्रुतगती मार्गाचा वेग वाढवण्यात आला. नगर ते मनमाड पर्यतंचा टप्पा पुर्ण होण्यास अजुन एक वर्ष लागतील असा अंदाज आहे. यावेळी ताशी 130 वेगाने धावली आणि ही चाचणी यशस्वी झाली. या महत्त्वाकांक्षी कामामुळे नगरला फायदा होणार असून नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होईल.