
पंजाब पोलिसांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची विविध ठिकाणी धरपकड केल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी पंजाब पोलिसांनी शंभू-अंबाला महामार्ग खुला केला. तब्बल 13 महिन्यांनी या महामार्गावरील बॅरीकेड्स हटवण्यात आले. आता खनौरी सीमादेखील खुली करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. हरयाणा पोलिसांनी काही ठिकाणचे बॅरीकेड्स हटवले आहे. दरम्यान, आज उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे. दरम्यान, आजही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.
दुसरीकडे शेतमालाला किमान हमीभावासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच असून पंजाबमधील मोगा, तरण तारण, मुक्तसर आणि फरीदकोड येथे शेतकऱयांनी दोन दिवसांपासून मोठया प्रमाणावर निदर्शने केली. पंजाब पोलिसांनी केलेल्या कारवाईवरूनच केंद्र सरकारची भूमिका दिसून येते. या हुकुशाहीविरोधात शेतकरी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत आहेत. प्रशासन आणि अधिकाऱ्यांशी करण्यात आलेल्या चर्चेतून तोडगा करण्यात आला होता. आता 21 मार्च रोजी आम्ही उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिह्यात मोर्चा काढण्यात येईल असे शेतकरी नेते राकेश टीकैत म्हणाले.
महामार्ग रोखून धरला; अनेक शेतकरी ताब्यात
फरीदकोट येथे शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली होती. परिस्थिती चिघळू नये म्हणून अनेक शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकऱयांना ताब्यात घेण्यात आले. याविरोधात शेतकऱ्यांनी फिरोजपुर येथे जोरदार आंदोलन केले. मोगा येथे पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाला घेराव घालण्यात आला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी शेतकऱयांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या रुद्रावतारामुळे पोलिसांनी तेथून काढता पाय घेतला.
- जालंधर येथे शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांना भेटण्यावर शेतकरी अडून बसले. यावरून पोलीस आणि शेतकऱयांमध्ये प्रचंड वाद झाला. डल्लेवाल यांना जालंधर येथील कैंट स्थित बीडब्ल्यूडी गेस्ट हाऊस येथे आणण्यात आले. याबाबत कळताच शेतकऱ्यांनी त्यांना भेटण्याची मागणी लावून धरली. परंतु, पोलिसांनी त्यासाठी नकार दिला.
- अमृतसर येथे शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. दुपारपर्यंत जवळपास 300 शेतकऱ्यांनी रंजीत एवेन्यू मैदानात जमून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मोठय़ा संख्येने शेतकऱयांना ताब्यात घेण्यात आले.
- मोगा येथे पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर पोलिस आणि शेतकऱयांमध्ये चकमक उडाली.