
विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असताना स्कूल बस नाल्यात कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी पंजाबमधील फिरोजपूरमध्ये घडली. बसमध्ये 20 विद्यार्थी होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
एका खासगी शाळेची स्कूल बस शनिवारी नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घेऊन निघाली. यादरम्यान अरमानपुरा गावाजवळ बस नाल्यात कोसळली. आपत्कालीन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. फिरोजपूर प्रशासनाकडून अपघात प्रकरणी चौकशी सुरू आहे.