शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आता आक्रमक झाले आहेत. संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाच्या नेतृत्वाखाली पंजाब बंदची हाक देण्यात आली आहे. हा बंद सोमवारी दुपारी 4 वाजेपर्यंत आहे. या काळात वैद्यकीय सेवेसह अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या बंदमुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या आंदोलनामुळे 221 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत,तर अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. तसेच रस्ते वाहतूक आणि विमान सेवेवरही बंदचा परिणाम झाला आहे.
संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी हा बंद पुकारला आहे. बंदच्या काळात वैद्यकीय सेवेसह अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. पिकांसाठी एमएसपी हमी कायद्यासह 13 मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यासाठी सोमवारी पंजाब बंदची हाक देण्यात आली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पंजाबमध्ये 200 ठिकाणी रस्ते रोखण्यात आले आहेत. जालंधर-दिल्ली राष्ट्रीय महामार्ग आणि अमृतसर-दिल्ली महामार्गावर शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. मोहालीत विमानतळ रस्ता रोखण्यात आला आहे. पंजाबमधील मोहाली जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे 600 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
एसजीपीसीसह अनेक धार्मिक आणि सामाजिक संघटनांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे. पंजाब बंद दरम्यान आपत्कालीन सेवा सुरू राहणार असल्याचे शेतकरी नेत्याने सांगितले. तसेच कोणत्याही विवाह समारंभाला जाणाऱ्या व्यक्ती व कुटुंबीयांना रोखले जाणार नाही. पंजाबमधील हिवाळ्याच्या सुट्ट्यांमुळे शाळा बंद आहेत. संपामुळे पंजाब विद्यापीठाने सोमवारऐवजी मंगळवारी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. बससेवेशी संबंधित संघटनांनी सांगितले आहे की सोमवारी दुपारी 4 नंतर सेवा पूर्ववत होईल.
रेल्वे सेवेवर परिणाम झाला असून 15 गाड्या उशिराने धावत आहेत. तर 9 गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार नाही अशा ठिकाणी या गाड्या थांबवल्या जात आहेत. डीआरएम कार्यालय फिरोजपूरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वे प्रवाशांना बाधित गाड्यांची माहिती मिळत राहील. यासाठी स्थानकांवर हेल्प डेस्कची व्यवस्था करण्यात येणार असून पब्लिक ॲड्रेस सिस्टीमद्वारे सातत्याने माहिती दिली जाणार आहे.