राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ बंगल्यावरील लँडलाईन फोनवर वारंवार कॉल्स करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरवले. आरोपी नारायणकुमार सोनी याला दीड वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. सोनीला 14 डिसेंबर 2022 रोजी अटक केली होती. तेव्हापासून तो तुरुंगात आहे.
2 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ‘सिल्व्हर ओक’ बंगल्यावर आरोपी सोनीने फोन कॉल केला. सोनीने स्वतःचे नाव सांगून शरद पवार यांच्याबद्दल अर्वाच्य शब्द वापरले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर रात्री 8.20 वाजेपर्यंत वारंवार कॉल्स करून भीती निर्माण केली. याप्रकरणी टेलिफोन ऑपरेटर कृष्णा देऊळकर यांनी खबर दिल्यानंतर गावदेवी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सोनीला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य धरत न्यायदंडाधिकारी श्रीकांत निमसे यांनी सोनीला दोषी ठरवले.
शिक्षा माफ करण्यास कोर्टाचा स्पष्ट नकार
आरोपीने धमकीचे एक-दोन कॉल्स केलेले नाहीत, तर दीर्घकाळापासून अनेकदा कॉल्स केले. प्रत्येकवेळी अर्वाच्य भाषा वापरून जीवे मारण्याची धमकी दिली. फोन कॉल्सच्या न्यायवैद्यक अहवालामधून हे स्पष्ट झाले. ही वस्तुस्थिती गांभीर्याने विचारात घेत न्यायालयाने फौजदारी दंड संहितेच्या कलम 360 मधील तरतुदीच्या आधारे आरोपी सोनीची शिक्षा माफ करण्यास स्पष्ट नकार दिला.