
हिंदू व्यापाऱ्याच्या मुलीला अजमत उर्फ अज्जू खान आणि त्याची टोळी दिवसाढवळ्या छेडछाड काढत भर बाजारपेठेत मारहाण करते. भवानीनगरचा मौलवीच या टोळीचा गॉडफादर आहे म्हणूनच पोलिसांनी राजकीय दबावातून खानवर थातूरमातूर एफआयआर नोंदवली. त्याचा चोवीस तासांच्या आत जामीन करण्यासाठी वकीलसुद्धा त्यांनीच पुरवला. खान टोळीवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करत त्याच्या मुसक्या आवळण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शहरप्रमुख किरण काळे यांनी पत्राद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे. तसेच गंज बाजारातील बंद पडलेली पोलीस चौकी तत्काळ पुन्हा सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
मारहाणीच्या घटनेचा अहिल्यानगर शहर शिवसेनेने तीव्र निषेध केला आहे. शिवसेना व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे सांगत किरण काळे म्हणाले, ‘काही महिन्यांपूर्वी बाजारपेठेतच एका व्यापाऱ्यावर चाकूने खुनी हल्ला झाला होता. त्यापूर्वी व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवत अतिक्रमणांच्या विरोधामध्ये धरणे आंदोलन केले होते. मनपा आयुक्त, सत्ताधारी स्थानिक लोकप्रतिनिधींनी तत्काळ अतिक्रमण हटविण्याचे लेखी आश्वासन दिले होते. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी केली जात नाही. सध्या हिंदुत्ववाद्यांची सत्ता असूनही हिंदू व्यापारी मात्र पाकिस्तानी विचारांच्या अपप्रवृत्तींना तोंड देत आहेत. सत्ताधाऱ्यांनी हिंदू व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे. हिंदुत्ववादी सत्ताधाऱ्यांच्या या राज्यात हिंदू व्यापारी आणि आमच्या आई, बहिणी असुरक्षित आहेत. वारंवार होणारा हा प्रकार थांबला नाही तर नजीकच्या काळात एखाद्या व्यापाऱ्याची भरदिवसा हत्या होईल. काही लोक स्वतःच प्रश्न निर्माण करतात आणि नंतर ते सोडवण्याचा आव आणून स्वतःचीच पाठ थोपटतात. दिशाभूल करण्याचा बेगडी हिंदुत्वाचा हा बुरखा सर्व अहिल्यानगरकर ओळखून आहेत. शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड २५ वर्षे आमदार असताना व्यापाऱ्यांना कधीही त्रास झाला नाही. तो दहा वर्षांच्या काळात व्यापाऱ्यांना होत असल्याचा आरोपही किरण काळे यांनी केला.’
दरम्यान, अज्जू खान हा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता असल्याचा आरोप करत किरण काळे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबर असणारे त्याचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल केले आहेत. तसेच भवानीनगरच्या मौलवींच्या टोळ्या त्यांच्याच आशीर्वादाने खोटा हिंदुत्वाचा आव आणून हिंदुत्ववादी व्यापाऱ्यांकडून वर्गणीच्या नावाखाली खंडण्या वसुली करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.