गतविजेत्या पुणेरी पलटण संघाचे प्रो कबड्डी लीगच्या 11व्या पर्वातील आव्हान संपुष्टात आले आहे. मात्र आता हंगामाची विजयाने सांगता करून स्पर्धेचा शेवट गोड करण्याच्या निर्धाराने पुणेरी पलटणचे शिलेदार सोमवार, 23 डिसेंबरला मैदानावर उतरतील. घरच्या मैदानावर खेळण्यात आलेल्या चालू हंगामातील अखेरच्या टप्प्यात पुणेरी पलटणला आतापर्यंत केवळ एक विजय नोंदवता आला आहे. आता अखेरच्या सामन्यात त्यांची गाठ उद्या तमिळ थलैवाज संघाशी पडणार आहे.
बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. जयपूर पिंक पँथर्सने बंगाल वॉरियर्सचा पराभव केला, तेव्हाच खरे तर पुणेरी पलटणचे हंगामातील आव्हान संपुष्टात आले होते. या सामन्यानंतर पुणेरी पलटण संघाला तेलुगु टायटन्सविरुद्ध हार पत्करावी लागल्यावर त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. या अपयशातही सकारात्मक विचार करताना कर्णधार आकाश शिंदेने खेळाडूंवर विश्वास दाखवला. आकाश म्हणाला, ‘यंदाच्या हंगामात नवोदित खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. यामुळे वरिष्ठ खेळाडूंनादेखील प्रेरणा मिळत होती.’ पुणेरी पलटण संघाला आता हंगामाची अखेर विजयाने करायची आहे. अखेरच्या सामन्याविषयी विचारले असता आकाश म्हणाला, ‘अखेरचा सामना जिंकून सदैव आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या आमच्या चाहत्यांना जाता जाता विजयाची भेट द्यायची आहे. चाहत्यांच्या अखंड पाठिंब्यामुळे आम्हाला कायमच प्रेरणा मिळाली. आमच्या युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. अखेरच्या सामन्यातही ते अशीच कामगिरी करून दाखवतील याची मला खात्री आहे.