
दौंड तालुक्यातील कडेठाण येथे शेतात काम करणाऱ्या लता बबन धावडे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला नसून, उपसरपंच असलेल्या पुतण्यानेच खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
उपसरपंच अनिल पोपट धावडे, सतीलाल वाल्मीक मोरे (दोघे रा. कडेठाण, ता. दौंड, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अनिल हा कडेठाणचा उपसरपंच आहे.
कडेठाणच्या हद्दीत 7 डिसेंबर 2024 रोजी शेतात काम करणाऱ्या लता बबन धावडे (वय – 50) हिच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने मृत्यू झाल्याचा गाजावाजा आरोपींनी केला होता. ऊसशेताच्या बांधाच्या कडेला रक्ताळलेल्या अवस्थेत लता यांचा मृतदेह आढळला होता. पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच मृतदेह हलविण्यात आला होता. या मृतदेहाचे शवविच्छेदन पुणे येथील ससून रुग्णालयात करण्यात आले.
गंभीर मार लागल्याने लता यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले होते. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करीत या खुनाचा उलगडा केला. आरोपींनी अनैतिक संबंधाच्या कारणावरून संगनमत करून लता धावडे यांना तोंड व डोके दगडाने ठेचून ठार मारल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याबाबत पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी फिर्याद दिली असून, या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पी. एच. संपांगे करीत आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नारायण देशमुख, सहायक निरीक्षक प्रवीण संपांगे, उपनिरीक्षक सलीम शेख, किशोर वागज, सहायक फौजदार महेंद्र फणसे, भानुदास बंडगर, हवालदार गुरुनाथ गायकवाड, संदीप देवकर, अक्षय यादव, महेंद्र चांदणे, विकास कापरे, रामदास जगताप, गणेश कुतवळ, दत्तात्रय काळे, आलिशा वानखेडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.