पुण्यातील मतदारांना गावाकडे ओढले, उमेदवारांकडून लक्झरी गाड्या बुक; शहरी मतदानाच्या टक्केवारीचे टेन्शन

पुणे शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुबार नावे मतदार यादीत असल्याने राज्याच्या ग्रामीण क्षेत्रातील उमेदवारांनी पुण्यातील मतदार वाहतूक करून गावाकडे चालवले आहेत. विशेषतः सातारा, सांगली, मराठवाड्यातील काही जिल्हे त्याचबरोबर पुणे शहरालगतच्या तालुक्यांमधील मतदारसंघांमध्ये मतदार खेचण्यासाठी स्पर्धा लागली आहे.

निवडणूक आणि जिल्हा प्रशासनाकडून गेले दीड-दोन महिने पुण्यामध्ये शहरी मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत; मात्र पुण्यातील किमान दीड ते दोन लाख मतदार त्यांच्या मूळ गावाकडे मतदानासाठी निघाले आहेत, किंबहुना अनेकांना गावाकडे बोलवून घेऊन गावीच ठेवण्यात आले आहे. दुबार नोंदणी असलेल्या मतदारांच्या या भूमिकेमुळे पुण्यातील मतदानाचा टक्का वाढवणे हे प्रशासनापुढे सर्वांत मोठे आव्हान आहे.

पुणे शहर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्था, उद्योग आस्थापना त्याचबरोबर मराठवाडा आणि खान्देश भागातून मोठ्या प्रमाणात लोक नोकरी, व्यवसाय आणि रोजगारासाठी पुण्यात आहेत. महापालिका निवडणुकांच्या काळामध्ये या मतदारांची नोंदणी पुण्यातील मतदार यादीत करण्यात आली, मात्र त्यांचे गावाकडे असणारे नाव मतदार यादीत कायम आहेत. या खेपेला विधानसभा निवडणूक राज्यभर एकाच दिवशी होत असल्यामुळे अनेकांचे राजकीय हितसंबंध लक्षात घेता गावाकडे जाऊन मतदान करण्यावर कल दिसून येत आहे.

उमेदवाराकडून त्यांच्या भागातील पुण्यात राहणाऱ्या परंतु गावाकडच्या मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांसाठी वाहनांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. शेकडो लक्झरी गाड्या तसेच वाहने बुक करण्यात आली असून, जे मतदार स्वतःच्या वाहनातून मतदानासाठी येतील त्यांना गाडी खर्च आणि जेवणाच्या खर्चाची जबाबदारीदेखील उमेदवारांनी घेतली आहे.

पुण्यातून सांगली, सातारा आणि कोल्हापूर पट्टयात सुमारे 70 ते 80 हजार मतदार जाण्याची शक्यता आहे. याशिवाय बीड, जालना, धाराशीव, त्याचबरोबर खान्देशातील नंदुरबार, धुळे आणि नाशिक, नगर या जिल्ह्यांमध्येदेखील सुमारे पाऊण लाख मतदार गावाकडे निघाले आहेत. याशिवाय शहरालगतच्या मुळशी, भोर, वेल्हे, शिरूर, पुरंदर, खेड, आंबेगाव या मतदारसंघांतही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मतदार गावाकडे मतदानाला पसंती देत आहेत.

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 88 लाख 49 हजार 590 मतदार आहेत. यामध्ये किमान चार ते पाच लाख मतदारांची नावे दुबार आहेत. गेल्या लोकसभा आणि त्याआधीच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ही साधारणतः 52 ते 55टक्क्यांच्या दरम्यान राहिली आहे. यावेळी राज्यभर मतदानाची तारीख एकच असल्याने दुबार मतदार बाहेरगावी निघून गेल्यास मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.