पुणे, धाराशीवला जेतेपदाचा मान, मुंबई उपनगर व सांगलीला उपविजेतेपद

पुण्याने मुंबई उपनगरचा 18-14 असा चार गुणांनी पराभव करत आपले पुरुष गटाचे जेतेपद राखले तर धाराशीवने सांगलीची धूळधाण उडवत हिरकमहोत्सवी राज्य खो-खो स्पर्धेत महिला गटाच्या अजिंक्यपदावर आपले नाव कोरले.

पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात पुण्याने आपले सलग दुसरे जेतेपद पटकावताना मुंबई उपनगरचे कडवे आव्हान मोडीत काढले. मध्यंतराला पुण्याने 10-7 अशी 3 गुणांची घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. पुण्याकडून शुभम थोरात, प्रतीक वाईकर, अथर्व देहेण यांनी चांगला खेळ करत विजयात मोलाची भूमिका बजावली. मुंबई उपनगरकडून निहार दुबळे, ओंकार सोनावणे, अनिकेत पोटे यांनी जोरदार खेळ करत उपनगरला आघाडी मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला, पण त्यात ते अपयशी ठरले.

महिलांचा अंतिम सामना एकतर्फी झाला. धाराशीव संघाने सांगलीचा 1 डाव 1 गुणांनी (11-10) धुव्वा उडवत जेतेपदावर आपल्या नावाची मोहोर उमटवली. पहिल्या डावात सांगली संघाला केवळ 5 गुण मिळवता आले, तर धाराशीवने आक्रमक खेळ करत 11 गुण मिळवले. त्यामुळे मध्यंतराला धाराशीवकडे 6 गुणांची आघाडी होती, जी सांगलीला पार करता आली नाही.

दुसऱया आक्रमणात सांगलीला फक्त 5 गुण मिळवता आले, त्यामुळे धाराशीव संघाने सहज विजय मिळवला. संध्या सुरवसे, संपदा मोरे, अश्विनी शिंदे, तन्वी भोसले यांनी उत्कृष्ट खेळ केल्यामुळे धाराशीवला खणखणीत जेतेपद संपादता आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना प्रत्येकी दहा हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. पुण्याच्या शुभम थोरातला छत्रपती संभाजीराजे व धाराशीवच्या संध्या सुरवसेला राणी अहिल्याबाई पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.