स्वारगेट आगारात महिलांकडून ‘तिरडी’ आंदोलन

स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बसस्थानकांत सुरक्षाकक्षाच्या जवळ बलात्काराची घटना घडत असताना येथील सुरक्षारक्षक काय करत होते, असा सवाल करीत येथील सुरक्षा यंत्रणा तसेच सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांच्या  पार्श्वभूमीवर महिला जागर समितीतर्फे महिला सुरक्षिततेची प्रतीकात्मक तिरडी काढून निषेध आंदोलन करण्यात आले.

एस.टी. महामंडळाकडे सुरक्षा विभाग पूर्ण कार्यक्षमतेने चालू राहावा इतकेही पैसे नाहीत का? ते नसतील तर सरकार ती तरतूद का करत नाही? असे सवाल महिलांनी उपस्थित केले.  भाजपा सरकारने लाडक्या बहिणींना एकवेळ पंधराशे रुपये दिले नाहीत, तरी चालेल पण त्यांना सुरक्षितता मिळाली पाहिजे यासाठी योग्य ती पावले उचलली पाहिजेत, असे यावेळी संगिता तिवारी यांनी सांगितले.

एसटी महामंडळात आयपीएस अधिकारी नेमणार

स्वारगेट एसटी स्थानकात घडलेल्या घटनेनंतर आज परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आढावा बैठक घेतली. महामंडळात सुरक्षा कर्मचारी वाढविण्यासोबतच एक सुरक्षा रक्षक कमिटी नेमून त्यात आयपीएस दर्जाचा सुरक्षा अधिकारी नेमणार असल्याचे मिसाळ यांनी यावेळी सांगितले.