सलग दुसऱया दिवशी रेस्टॉरंट, बारच्या अतिक्रमणांवर हातोडा; 19 ठिकाणी कारवाईत 56 हजार चौ. फूट अतिक्रमण जमीनदोस्त

फर्ग्युसन रस्त्यावरील पबमध्ये रात्री उशिरापर्यंत मद्य विक्रीसह पार्टीमध्ये अमली पदार्थाचे सेवन होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर थंडावलेला महापालिकेच्या बांधकाम विभागाला आता हॉटेल, बार, पबच्या अतिक्रमणावर नाइलाजाने कारवाई करावी लागत आहे. मंगळवारनंतर सलग दुसऱया दिवशी शहरातील विविध भागांतील हॉटेल्स, बारच्या साईड आणि फ्रंट मार्जिनमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. बुधवारी 19 ठिकाणी केलेल्या कारवाईत तब्बल 56 हजार चौ.फूट क्षेत्र रिकामे केले.

महापालिकेने बुधवारी बाणेर येथील द कॉर्नर लाऊंज बार, एमएल सिटोबार, ईस्को बार, इलीफ्ट बार, ब्रीव्ह मर्चंट क@फे, उरबो किचन बार, नेटीव बार, द ज्यॉईस बॉय, फिलेमिट बार, बाणेर थ्रीमिस्टेक टर्स, मनाली बार, डॉक यार्ड, कोरेगाव पार्क येथील ग्रेडमामस, पार्क डाबा शाब, निरंजन कवडे, प्रेम रेस्टॉरंट, टल्ली बार, शिवाजीनगर येथील फर्ग्युसन रस्त्यावरील सोशल हॉटेल आणि हडपसर-सासवड रस्त्यावरील एका हॉटेलचा यामध्ये समावेश आहे. मागील दोन दिवसांत पालिकेने जवळपास 92 हजार 906 चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम आणि शेडस् पाडले आहेत. महिनाभरापूर्वी कल्याणीनगर येथे पबबाहेर झालेल्या पोर्शे कार अपघातानंतर नुकतेच फर्ग्युसन रस्त्यावरील थ्री एल पबमध्ये मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या पार्टीमध्ये मद्यासोबतच अमली पदार्थांचे सेवन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तत्पूर्वी चार महिन्यांपूर्वी ससूनमध्ये उपचारासाठी दाखल असलेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील हा रुग्णालयातूनच ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याचे उघडकीस आले होते.

विरोधकांनी मुद्दा उचलल्यावर प्रशासनाला जाग

विरोधकांनी हे मुद्दे उचलून धरल्यानंतर भानावर आलेल्या राज्य शासनाने पोलीस, महापालिका आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला बेकायदा पब आणि बारसह हॉटेल्सवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे इतरवेळी कारवाईसाठी बंदोबस्त देण्यास टाळाटाळ करणाऱया पोलीस प्रशासनाने स्वतःहून पालिकेला कारवाई कोठे करायची अशी विचारणा करत बंदोबस्त देण्यास सुरुवात केल्याने कारवाईला गती मिळाली आहे.