एमसीएफ राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरीत श्रुती, सागरची उपांत्य फेरीत धडक

बोरिवलीच्या मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशनच्या दहाव्या एमसीएफ राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरीत पुण्याच्या सागर वाघमारेने मुंबईच्या नीलांश चिपळूणकरवर 25-5, 25-1 अशी मात करून उपांत्य फेरीत धडक मारली. तसेच महिला एकेरीत पालघरच्या श्रुती सोनावणेने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत 5-25, 20-15 व 24-23 असा विजय मिळवत उपांत्यपूर्व सामना जिंकला.

उपउपांत्यपूर्व सामन्यात नीलांश चिपळूणकरने माजी विश्व विजेत्या प्रशांत मोरेला सरळ दोन सेटमध्ये हरवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. परंतु अनुभवी सागरसमोर तो अगदी निष्प्रभ ठरला. त्याला सरळ सेट्समध्ये सागरने हरवले. महिला एकेरीचा उपउपांत्य सामना चांगलाच रंगला. दोन सेटनंतर 1-1 अशी बरोबरी होती आणि तिसऱ्या सेटमध्ये आठव्या बोर्डनंतर दोन्ही खेळाडूंचे 23-23 असे समान गुण झाल्याने नववा बोर्ड खेळविण्यात आला. नवव्या बोर्डात नाणेफेक जिंकल्याने श्रुतीला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. हा अंतिम व अतिरिक्त बोर्ड शेवटपर्यंत रंगला आणि केवळ एक गुण मिळवत श्रुतीने या सामन्यात निसटता विजय प्राप्त केला. नुकत्याच शिव छत्रपती पुरस्काराने गौरविलेल्या आकांक्षासाठी हा अनपेक्षित धक्का आहे.

पुरुष एकेरी गटाचे उपउपांत्य फेरीचे निकाल

 प्रफुल मोरे (मुंबई ) वि. वि. ओंकार टिळक ( मुंबई ) 13-17, 19-4, 21-14,

महम्मद घुफ्रान (मुंबई ) वि. वि.संजय मणियार (मुंबई उपनगर) 25-1, 25-6,

पंकज पवार (ठाणे) वि. वि. समीर अंसारी (ठाणे ) 25-9, 24-8.

महिला एकेरी गटाचे उपउपांत्य फेरीचे निकाल

अंबिका हरिथ (मुंबई ) वि. वि. ऐशा साजिद खान (मुंबई) 25-5, 17-18, 25-22,

प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर) वि. वि. रिंकी कुमारी (मुंबई) 25-10,25-12,

मिताली पाठक (मुंबई) वि. वि. समृद्धी घाडीगावकर (ठाणे ) 24-6, 5-23, 25-0.