पूजा खेडकरच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल, शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी रिव्हॉल्व्हर रोखून एका शेतकऱ्याला दमदाटी केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर सदर शेतकऱ्याने खेडकर दाम्प्त्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पुण्यातकील पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर व दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली होती. मात्र ती जमीन ताब्यात घेताना त्यांनी शेजाऱ्यांचीही जमीन ताब्यात घ्यायचा प्रयत्न केल्यामुळे गावकऱ्यांनी आक्षेप घेतला आणि त्यातून हा वाद उद्भवला, असं सांगितलं जात आहे. मला कायदा सांगू नका, सातबाऱ्यावर माझं नाव आहे, असे त्या शेतकऱ्यांना दरडावून सांगताना दिसत आहेत. तसेच शेतकऱ्यांना ओरडत असताना त्यांनी त्यांच्यावर बंदूक देखील रोखली होती. त्यांचा रिव्हॉल्व्हर रोखून दमबाजी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पुणे जिल्ह्यात प्रोबशनरी आयएएस म्हणून आलेल्या आणि गैरवर्तनामुळे वाशीमला रवानगी करण्यात आलेल्या पूजा खेडकर सध्या चर्चेत आहेत. पुण्यापासून त्यांच्या कारनाम्यांची चर्चा असून आता थेट दिल्लीमध्येदेखील चौकशी सुरू होणार आहे.