पुणे आरटीओकडून ‘वारीत’ रस्ता सुरक्षेचा जागर, रेनकोट, बॅगा वाटप; नेत्र तपासणी

वारीत सहभागी झालेल्या भाविकांना रस्ता सुरक्षेचे संदेश असणार्‍या बॅग्स आणि जवळपास एक हजारहून अधिक रेनकोट वाटप करून प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जनजागृती केली. यावेळी रस्तासुरक्षा व उपाय, वाहतूक नियम, सहकार्य, शिस्त, वेग नियंत्रण यांचा जागर केला. तसेच, वारकर्‍यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर राबविण्यात आले.

वाहतूक नियमांबाबत जनजागृती आणि रस्त्यावरील वाढते अपघात कमी होण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा कार्यालयाकडून ‘अपघातमुक्त वारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामाध्यमातून वारीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांना रस्ता सुरक्षेचे महत्व पटवून देण्यात येत आहे. विसाव्याच्या ठिकाणी भेट देवून रस्ता सुरक्षेबाबत प्रबोधन, ठिकठिकाणी बॅनर्स लावणे असे उपक्रम यामाध्यमातून राबविण्यात येत आहेत. प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी युवराज पाटील, अमर देसाई, मोटार वाहन निरीक्षक निलेश बनसोडे, लखनकुमार झुनके, सहायक निरीक्षक भाग्यश्री पाटील, सोनल गावित यांच्या उपस्थितीत भाविकांना दीड हजार पाण्याच्या बाटल्या, रेनकोट आणि बॅग्स वाटप करण्यात आले.